भाईंदर परिवहन बसच्या ड्रायव्हरवर प्राणघातक हल्ला, केबीनमध्ये घुसून कपडे फाडले; दांडक्याने डोके फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाईंदर परिवहनच्या बसला स्कुटीचालकाने कट मारल्याच्या वादातून ड्रायव्हरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ठाण्यातील कोपरी बस डेपो परिसरात घडली आहे. शंकर चव्हाण असे चालकाचे नाव आहे. काही तरुणांनी बसच्या थेट केबीनमध्ये घुसून चालकाचे कपडे फाडले. एवढेच नव्हे तर दांडक्याने त्याचे डोकेही फोडले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चालकाला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मीरा-भाईंदरमधील गायमुख परिसरात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास स्कुटीचालकाने भाईंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या परिवहनच्या बसला कट मारली. त्यामुळे वाद निर्माण झाला. हा वाद चिघळला आणि स्कुटीचालकाने आठ ते दहा साथीदारांना कोपरी बस डेपो परिसरात बोलावून परिवहनचा चालक शंकर चव्हाण याला केबीनमध्ये घुसून बेदम मारहाण केली. चव्हाण याला अक्षरशः आडवे करून त्याच्यावर दांडक्याने हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.