
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात गुरुवारी एक सुवर्णक्षण नोंदवला गेला. टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कणा असलेला रोहित शर्मा याने ‘पलटण’सोबतच्या आपल्या प्रवासाची यशस्वी 15 वर्षे पूर्ण केली आहेत. 2011 मध्ये सुरू झालेला हा प्रवास केवळ एका खेळाडूचा नसून एका महान नेतृत्वाच्या उदयाची ही गाथा आहे.
रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्सकडून केली होती. मात्र, 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या मागे खुद्द क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मोठा वाटा होता. माजी वेगवान गोलंदाज अतुल रानडे यांच्या उपस्थितीत सचिनने रोहितला संघात घेण्याचा आग्रह धरला होता. सचिनचा तो विश्वास आज 5 आयपीएल ट्रॉफींच्या रूपाने सार्थ ठरला आहे.
View this post on Instagram
2013 हे वर्ष रोहितच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. रिकी पाँटिंगने कर्णधारपद सोडल्यानंतर मधल्या सत्रात रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्याच वर्षी त्याने मुंबईला पहिले विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी पाच विजेतेपद पटकावली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने सर्वाधिक 87 सामने जिंकले. तसेच आयपीएल फायनलमध्ये कर्णधार म्हणून 5-0 असा निर्भेळ रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे.
Moment hai bhai, moment hai! 💙 pic.twitter.com/FjAQfOMofY
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2026
वानखेडेवर सन्मान आणि फलंदाजीचा दबदबा
रोहित शर्मा केवळ कर्णधार म्हणूनच नाही, तर फलंदाज म्हणूनही मुंबईचा राजा आहे. त्याने 230 सामन्यांत सर्वाधिक 5994 धावा केल्या आहेत. त्याच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत गेल्या वर्षी वानखेडे स्टेडियमवर त्याच्या नावाने एका स्टँडचे नामकरणही करण्यात आले. आयपीएल 2026 च्या हंगामातही त्याने 3 सामन्यांत 118 धावा फटकावून आपला फॉर्म कायम राखला आहे.
“मुंबई इंडियन्समध्ये येणे हे माझ्यासाठी घरी परतल्यासारखे होते. हा 15 वर्षांचा प्रवास माझ्यासाठी केवळ खेळ नसून एक भावना आहे.”
– रोहित शर्मा





























































