चेहऱ्यावर व्रण, शरीरावर गंभीर जखमा! कशी मोज्तबा खामेनी यांची प्रकृती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 40 दिवसांपासून आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण जगात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धाच्या सुरूवातीला झालेल्या एअरस्ट्रॉकमध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. यानंतर 8 मार्च रोजी त्यांची सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाली, मात्र अद्याप ते सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मोज्तबा खामेनी यांची प्रकृतीबाबत इराण सरकारने अधिकृतरीत्या कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या मते, या हल्ल्यात त्यांनी आपला एक पाय गमावला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इराणच्या माध्यमांनी त्यांचा उल्लेख ‘जांबाज’ असा केला आहे, जो शब्द युद्धात गंभीर जखमी झालेल्या योद्ध्यांसाठी वापरला जातो. त्यांच्या चेहऱ्याला झालेल्या जखमांमुळे त्यांचे रूप बदलले असल्याचेही सांगण्यात येत आहे, ज्यामुळे त्यांचा कोणतीही नवीन फोटो प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

शारीरिक जखमा गंभीर असल्या तरी मोज्तबा खामेनी हे मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. ते ऑडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये सहभाग घेत असून देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वाटाघाटी आणि युद्धनीतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रकृतीत सुधारणा झाल्यास पुढील एक-दोन महिन्यांत त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ प्रसिद्ध केले जाऊ शकतात.

सार्वजनिक ठिकाणी मोज्तबा खामेनी यांच्या अनुपस्थितीमुळे इराणमधील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर मोज्तबा कुठे आहेत? अशा आशयाचे मीम्स व्हायरल होत असून, सत्तेच्या खऱ्या उत्तराधिऱ्याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. 8 मार्चला पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी केवळ लेखी निवेदने प्रसिद्ध केली आहेत, ज्यात त्यांनी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद ठेवण्याचे आणि अमेरिकेला विरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, युद्धाशी संबंधित इतर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय सध्या इतर वरिष्ठ अधिकारी जाहीर करत आहेत.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’ (IRGC) ही संस्था निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावशाली ठरत आहे. जोपर्यंत मोज्तबा स्वतः समोर येऊन नेतृत्व सिद्ध करत नाहीत, तोपर्यंत इराणच्या अंतर्गत सत्ता संतुलनात त्यांचे स्थान पूर्णपणे भक्कम होणे कठीण असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.