साडेतीन दशकांचा थरार! दरोड्यासाठी घरमालकिणीचा खून करणाऱ्या आरोपीला ३५ वर्षांनंतर अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली पोलिसांनी १९९१ मधील हत्येचे एक गुंतागुंतीचे प्रकरण उलगडण्यात यश मिळवले आहे. आपल्या घरमालकिणीची हत्या करून आणि तिच्या मुलाला जखमी करून गेल्या ३५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली.

पीटीआय (PTI) ने दिलेल्या वृत्तानुसार, छवी लाल वर्मा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९९१ मध्ये एका दरोड्याच्या उद्देशाने त्याने आपल्या घरमालकिणीवर जीवघेणा हल्ला केला होता. अटक टाळण्यासाठी त्याने इतकी वर्षे आपल्या मूळ गावी जाणे टाळले, इतकेच नव्हे तर स्वतःच्या मुलांच्या लग्नासारख्या महत्त्वाच्या कौटुंबिक प्रसंगांनाही तो गैरहजर राहिला होता.

काय आहे प्रकरण?

ही घटना २ ऑगस्ट १९९१ रोजी पूर्व दिल्लीतील त्रिलोक पुरी परिसरात घडली होती. छवी लाल वर्मा हा पीडित महिलेच्या घरात भाड्याने राहत होता. महिलेचा पती परदेशात असल्याने तिच्याकडे मोठी रोकड असेल, या हेतूने त्याने दरोड्याचा कट रचला. दरोड्याला विरोध केला असता त्याने धारदार शस्त्राने महिला आणि तिच्या १८-२० वर्षीय मुलावर वार केले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला, तर मुलगा उपचारांनंतर बचावला.

असा लागला छडा

१० मे १९९६ रोजी दिल्ली न्यायालयाने वर्माला फरार घोषित केले होते. गेली साडेतीन दशके तो ओळख आणि ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण पुन्हा उघडले. तांत्रिक पाळत आणि जुन्या नोंदींच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना तो लुधियानामध्ये असल्याची माहिती मिळाली.

तपासादरम्यान असे समोर आले की, अटकेपासून वाचण्यासाठी तो कोलकाता, मुंबई, नागपूर आणि गोवा अशा विविध शहरांमध्ये फिरत होता. शेवटी तो पंजाबमध्ये स्थायिक झाला आणि तिथे एका व्यावसायिक प्रतिष्ठानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करू लागला.

१० एप्रिल रोजी अटक

विश्वासार्ह माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून १० एप्रिल रोजी लुधियाना येथून वर्माला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला असून केवळ पैशांच्या हव्यासापोटी हा हल्ला केल्याचे त्याने सांगितले. गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्रिलोक पुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.