चार महिन्यांत ‘एआय’ने खाल्ल्या 80 हजार नोकऱ्या, कंपन्यांची कर्मचारी कपात करून आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये गुंतवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2026 हे वर्ष हजारो कर्मचाऱ्यांसाठी अनलकी ठरले आहे. टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये अवघ्या चार महिन्यांत जवळपास 80 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे संपूर्ण जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही कर्मचारी कपात सर्वसामान्य नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे करण्यात आली आहे. जगातील आघाडीच्या कंपन्या कर्मचारी कपात करत असून एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.

निक्केई आशियाच्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे. जगातील मोठ्या टेक कंपन्यांनी या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जवळपास 80 हजार कर्मचारी कपात केली आहे. परंतु एका नव्या अहवालात धक्कादायक माहिती असून ही कर्मचारी कपात इथेच थांबणार नाही, तर आणखी कपात होईल, असे म्हटले आहे. रेशनल एफएक्सच्या अहवालानुसार, 1 जानेवारी ते 1 एप्रिल या दरम्यान टेक्नोलॉजी सेक्टरमध्ये एकूण 78,557 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

10 वर्षांत 7 टक्क्यांपर्यंत नोकऱ्या जातील

गोल्डमन सचच्या एका अहवालानुसार, पुढील 10 वर्षांत अमेरिकेत एआयमुळे 7 टक्क्यांपर्यंत नोकऱ्या जातील. यामुळे अमेरिकेत बेरोजगारी वाढेल. ज्या लोकांची नोकरी जाईल. त्यांच्या कमाईत घसरण येईल. ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल त्यांना त्याच पगाराची नोकरी मिळणे अवघड होईल. खास करून झेन जी कर्मचाऱ्यांवर याचा जास्त परिणाम होईल. त्यांना कमी स्कील्सच्या नोकऱ्यांमध्ये जावे लागू शकते, असे या अहवालात म्हटले आहे.