पूर्ण माघार घ्या! इराण आक्रमक!! पाकिस्तानात चर्चेची पहिली फेरी पूर्ण, आता ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेल्या चर्चेदरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून मतभेद निर्माण झाला. चर्चेच्या दुसऱ्या फेरीत होर्मुझवरून इराणने ठाम भूमिका घेतली. इराणने चर्चेदरम्यान अतिशय आक्रमक भूमिका घेत अमेरिकेसमोर चार अटी ठेवल्या आहेत. अमेरिकन सैन्याची आखाती देशांमधून संपूर्ण माघारी, होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजे जातील आणि त्यावर शुल्क आकारण्यात येईल, लेबनॉनमध्ये तत्काळ युद्धविराम आणि विदेशी बँकांमध्ये गोठवण्यात आलेली इराणची अब्जावधी डॉलरची मालमत्ता मुक्त करणे, या अटी इराणने ठेवल्या. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला असून इराणच्या मालमत्ता मुक्त करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हेन्स यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज पहाटे इस्लामाबाद येथे दाखल झाले. चर्चेपूर्वी लेबनॉनमध्ये युद्धबंदीच्या अटीवर ठाम असलेल्या इराणचे शिष्टमंडळदेखील आज सकाळी इस्लामाबाद येथे पोहोचले. सर्वप्रथम व्हेन्स आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गलिबाफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरीफ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर हिंदुस्थानच्या प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अमेरिका-इराण चर्चेला सुरुवात झाली. चर्चेच्या प्रारंभीच इराणने चार अटी ठेवल्या. सुमारे दोन तास दोन्ही देशांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चेची पहिली फेरी पार पडली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची, अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हेदेखील चर्चेत सहभागी झाले होते.

युद्धबंदीनंतर पहिले हिंदुस्थानी एलपीजीवाहू जहाज रवाना

इराण आणि अमेरिकेत दोन आठवड्यांची युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर ‘जग विक्रम’ हे पहिले हिंदुस्थानी एलपीजीवाहू जहाज होर्मुझची सामुद्रधुनी पार करून हिंदुस्थानकडे रवाना झाले. या जहाजात सुमारे २०,४०० टन एलपीजी आहे.

इराणचे नौदल, हवाई दल संपले ट्रम्प यांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न

एकीकडे चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. इराणचे नौदल आणि हवाई दल संपले आहे. विमान विरोधी यंत्रणा आता अस्तित्वात नाही. दीर्घकाळ राहिलेले नेते जगात नाहीत. सागरी माईन्स पेरणाऱ्या नौकादेखील समुद्राच्या तळाशी गेल्या. आम्ही इतर देशांवर उपकार म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी साफ करत आहोत, अशी पोस्ट ट्रम्प यांनी टुथ या सोशल मीडियावर टाकली.

लेबनॉनवरील हल्ले तत्काळ थांबवा – इराण

शांतता चर्चेची पहिली फेरी हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजताच्या सुमारास आटोपली. लेबनॉनवरील हल्ले तत्काळ थांबवावेत, अशी इराणने मुख्य मागणी आज केली. याशिवाय इतर तीन मागण्या इराणने केल्या.

चर्चा निष्फळ ठरल्यास अमेरिकेची जबाबदारी

इस्लामाबाद येथील चर्चा निष्फळ ठरल्यास केवळ इस्रायलला दोष देऊन चालणार नाही. इस्रायल आणि अमेरिकेचे निर्णय एकमेकांशी जुळलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेवरदेखील जबाबदारी असेल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे.

शांतता चर्चेत चीनची हमी?

पाकिस्तानात सुरू असलेल्या चर्चेत चीनदेखील सहभागी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनचे एक शिष्टमंडळ इस्लामाबाद येथे दाखल होत असून ते मध्यस्थीसाठी पाकिस्तानची मदत करेल. वाटाघाटी यशस्वी झाल्यास चीन हमी देऊ शकतो.

होर्मुझमधून सागरी माईन्स हटवण्याचे काम सुरू

होर्मुझच्या सामुद्रधुनीत पेरलेले सागरी माईन्स हटविण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणने पेरलेल्या या माईन्स संपूर्ण जगासाठी धोका असून संपूर्ण जगासाठी त्या हटवत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

विमानातील आसनांवर मुलांची छायाचित्रे

चर्चेसाठी इराणहून रवाना झालेले गलिबाफ यांनी विमानातून अतिशय भावुक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. विमानातील समोरच्या आसनांवर 4 शाळकरी मुलांची छायाचित्रे ठेवली होती. त्या आसनांवर त्यांच्या रक्ताने माखलेले जोडे आणि शाळेच्या बॅगा ठेवल्या आहेत. 28 फेब्रुवारीला इराणच्या मिनाब शहरातील प्राथमिक शाळेवर हल्ला झाला होता. त्यात लहान मुलांसह 168 जणांचा मृत्यू झाला होता.

डिझेल आणि विमानाच्या इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ

इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेल आणि विमानांसाठी लागणारे एव्हिएशन टर्बाइन फ्यूलवरील (एटीएफ) निर्यात शुल्क दुपटीपेक्षा जास्त वाढवले आहे. डिझेलवरील निर्यात शुल्क 21.5 रुपये प्रति लिटरवरून थेट 55.5 रुपये प्रति लिटरपर्यंत तर, एटीएफवरील निर्यात शुल्क 29.5 रुपयांवरून वरून 42 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.