यंदाची अमरनाथ यात्रा 19 दिवस जास्त असणार, 3 जुलैपासून यात्रेला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमध्ये होणारी पवित्र अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होऊन 28 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,880 मीटर उंचीवर असलेल्या श्री अमरनाथ गुहा येथे दरवर्षी ही यात्रा पार पडते. यंदाची यात्रा 57 दिवसांची असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती 19 दिवसांनी जास्त आहे.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही माहिती देताना सांगितले की, यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होईल. भाविकांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी नोंदणी करता येणार असून देशभरातील 554 बँक शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. यात जम्मू अ‍ॅड काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांचा समावेश आहे. 29 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त ‘प्रथम पूजा’ होणार असून त्यानंतर यात्रेला सुरुवात होईल.

यंदा यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला RFID कार्ड देण्यात येणार असून अपघाताच्या प्रसंगी 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच यात्रेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या घोडे-खच्चरांसाठीही 50 हजार रुपयांचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

यात्रामार्गावर वीजपुरवठ्याची सोय, आवश्यक प्रकाशयोजना, तसेच घोडे, आणि पालखी यांसाठी प्री-पेड सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी बालटाल, पंथा चौक (श्रीनगर), नुनवान आणि चंदरकोट येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.