
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने आशाताईंना अत्यंत भावुक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आपल्यासाठी सदैव अविस्मरणीय राहतील, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रेट ली आणि आशा भोसले यांनी 2007 मध्ये ‘यू आर द वन फॉर मी’ या गाण्यासाठी एकत्र काम केले होते. आशाताईंच्या आठवणींना उजाळा देताना ब्रेट ली म्हणाला, आशा भोसले यांच्यासारख्या असामान्य प्रतिभेच्या धनी असलेल्या व्यक्तीसोबत गाणे लिहिणे आणि ध्वनिमुद्रित करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे. त्यांनी आयुष्यात जे काही मिळवले, त्यानंतरही त्यांचा नम्र स्वभाव आणि प्रेमळ वागणूक मनाला स्पर्शून गेली. सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये झालेल्या भेटीची आठवण सांगताना तो म्हणाला, आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही, मात्र त्यांचे संगीत पिढय़ान्पिढय़ा जिवंत राहील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.























































