
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात ६०० रिक्त पदांची भरती प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून रखडली आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेने अर्जदारांकडून प्रत्येकी १००० रुपयांचे नोंदणी शुल्क घेऊनही अद्याप ही भरती प्रक्रिया राबवली नसल्याने संतापलेल्या अर्जदारांनी पालिका मुख्यालयात धडक दिली. तर येत्या पाच दिवसांत हा प्रश्न निकाली काढला नाही तर पालिका मुख्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. यामध्ये फायरमन आणि ड्रायव्हर अशा ६०० पदांसाठी पालिकेने जाहिरात काढली. या ६०० पदांसाठी एकूण २५०० पेक्षा अधिक अर्ज आले असून प्रत्येक अर्जदाराने १०० रुपयांचे नोंदणी शुल्क भरले आहे. मात्र सहा महिन्यांपासून या भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याच प्रकारची हालचाल करण्यात आलेली नाही. सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि अर्जदारांनी पालिका मुख्यालयात येऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडूनही यासंदर्भात काही ठोस आश्वासन मिळू शकलेले नाही. दुसरीकडे जे कंत्राटी पद्धतीने काम करत आहे त्यांचे कंत्राट नूतनीकरण करत असल्याची बाब आमच्या लक्षात आली असून जर ते कंत्राट नूतनीकरण करत आहात तर ही सरळ भरती प्रक्रिया का राबवली जात नाही, असा प्रश्न अर्जदार गणेश आंधळे यांनी उपस्थित केला आहे.

























































