श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट सोसायटीची निवडणूक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट को- ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेची निवडणूक जाहीर झाली असून, 17 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र सहकार विभागाच्या नव्या नियमावलीनुसार दोन टर्म पूर्ण केलेल्या संस्थापक कडूभाऊ काळे यांना ही निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांच्यासाठी हा धक्का आहे.

संत नागेबाबा मल्टिस्टेटची गत निवडणूक प्रक्रिया ही 11 संचालक निवडण्यासाठी झाली होती. मात्र, सहकार कायद्यातील नव्या तरतुदींनुसार आगामी निवडणूक ही 15 संचालकांसाठी घेतली जाणार आहे. त्यासाठी राखीव प्रवर्गासाठीही जागा असतील.

तब्बल 1272 कोटींच्या पुढे ठेवी असलेली श्रीसंत नागेबाबा मल्टिस्टेट या संस्थेचा पुढील पाच वर्षांचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या 62 हजार 594 सभासदांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

संस्थापक कडूभाऊ काळेंना धक्का

सहकार विभागाच्या नव्या तरतुदीनुसार, दोन टर्म संचालक असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही. या नियमाचा पहिला फटका हा कडूभाऊ काळे यांना बसणार असून, त्यांना संचालक मंडळातून बाहेर राहावे लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

दि. 6 एप्रिल रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 10 एप्रिलपर्यंत त्यावर हरकती स्वीकारल्या जातील. 17 एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन 27 ते 29 एप्रिल सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. 30 एप्रिल रोजी छाननी 2 मेपर्यंत माघार आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी निश्चित होणार आहे. दि. 17 मे 2026 रोजी मतदान होईल. दि. 19 मे रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.