लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, व्यासंगी नेते अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे मंगळवारी सकाळी सवासात वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 95 वर्षे होते. सायंकाळी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लातूर पॅटर्नला राज्यस्तरावर ओळख मिळवून देणारे डॉ. गोपाळराव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी सवासात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, मुलगा सच्चिदानंद पाटील, सून स्नेहल, मुली स्नेहलता देशमुख, डॉ. गीतांजली पाटील, तारका शिंदे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सेवाभावी डॉक्टर

3 ऑक्टोबर 1931 रोजी धाराशिव जिल्हय़ातील कवठा येथे गोपाळराव पाटील यांचा जन्म झाला. हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस तसेच डीसीएच केले. लातूरमध्ये त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून ख्याती मिळवली. 1965 पासून ते वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. मुरूड परिसरात त्यांनी तब्बल 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा दिली. इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनची शाखा स्थापन करून पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्येही त्यांचा सहभाग होता.सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस’ म्हणत.