
निवडणूक आयोगाने बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चेन्नईतील पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले “दहशतवादी” हे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे प्राथमिक निरीक्षण आयोगाने नोंदवले. मात्र, खरगेंनी नंतर स्पष्टीकरण देताना आपण “दहशतवादी” असा शब्दशः अर्थाने उल्लेख केला नसून पंतप्रधान लोकशाही व्यवस्थेला “दहशतीखाली ठेवत आहेत” असा अर्थ अभिप्रेत असल्याचे स्पष्ट केले.
नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेल्या 24 तासांच्या मुदतीवरही काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्र लिहून अधिक वेळ देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, एकाच क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या नोटिसा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी जारी केल्या आहेत. यामुळे प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एका नोटीसमध्ये डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस) यांच्या तक्रारीचा उल्लेख आहे तर, दुसऱ्या नोटीसमध्ये तो उल्लेख गायब आहे. यावरून आयोग केवळ सत्ताधारी पक्षाच्या तक्रारींवर आधारित कारवाई करत असल्याचा आरोप जयराम रमेस यांनी केला आहे.
भाजपकडून झालेल्या कथित उल्लंघनांकडे आयोगाने दुर्लक्ष केल्याचाही आरोप काँग्रेसने केला. यात पंतप्रधान मोदी यांनी 131व्या घटनादुरुस्ती विधेयक अपयशी ठरल्यानंतर केलेले देशाला उद्देशून भाषण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिलांसाठी, बेरोजगारांसाठी आणि गर्भवतींसाठी आर्थिक मदतीच्या घोषणांच्या सोशल मीडियातील पोस्टचा उल्लेख केला. तसेच हे लाचलुचपत संबंधित आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

























































