
>> अरूण
‘खोप्यामधी खोपा सुगरनीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला’ हे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं एक हृदय गीत. त्या कवितेत त्या सुगरणीच्या घरटय़ाचं वर्णन ‘झुलता बंगला’ असं करतात ते अगदी यथार्थ आहे.
सुगरणीचा हा ‘खोपा’ प्रत्यक्षात मात्र तिच्या होणाऱया बाळाच्या पित्याने म्हणजे ‘नर’ सुगरणाने बांधलेला असतो. अर्थात सौ. सुगरण यजमानांना त्याकामी मदत करतातच. ‘खोप्याचं वैशिष्टय़ असं की, आधी अंडी आणि मग पिलाचं रक्षण व्हावं आणि ती सहजतेने कुणाच्या भक्ष्यस्थानी पडू नयेत म्हणून त्याचं प्रवेशद्वार एखाद्या नळीसारखं असतं. सुगरण पक्ष्यांची अशी घरटी ‘बाया विव्हर’ प्रजातीच्या पक्ष्यांच्या बाबतीत एखाद्या झाडावर किंवा अगदी एखाद्या उंच इमारतीच्या खिडकीवर पुढे आलेल्या भागाखाली (छज्जा) असतात. आशिया आणि आफ्रिका खंडात सुगरण पक्षी खूप आढळतात. इतर काही प्रजातींचे सुगरण एखाद्या विशाल झाडावर समूहाने घरटय़ाचं एक ‘गृहसंकुल’च साकारतात.
ते इतकं विशाल असतं की, काही वेळा त्यामुळे झाडाचा पर्णसंभार झाकला जातो. अशा या तंतूमय आणि मजबूत घरटय़ांची रचना एखाद्या ‘आर्किटेक्ट’ला चकित करेल अशी असते. आपल्या प्रियतमेसाठी नर सुगरण अवघ्या 18 ते 20 दिवसांत हे कठीण वाटणारं गृह विणकाम करतो. ते पुरेसं घट्ट आहे की नाही याचीही खात्री करतो. बहुतेक वेळा अशी घरटी सुरक्षेच्या दृष्टीने काटेरी झाडांवरच विणली जातात. यामध्ये घरटय़ाचा मधला भाग फुगीर असून त्यात मऊ कापसासारखी ‘गादी’ करून झाल्यावर सुगरण अंडी घालते.
बाया सुगरणीची टांगती घरटी बहुधा माडांवर असतात. चिवट गवताच्या धाग्यांची परस्परात गुंफण करत बाया सुगरणीचं ‘घरकुल’ तयार होते. आधी सुरक्षित जागा शोधून सुगरण दाम्पत्य त्यांच्या चाणाक्ष नजरेला दिसलेले काथ्यासारखे तंतू ते आणतात आणि मग नर सुगरण त्याच्या चोचीने ‘एक एक धागा जोडी’ असं करीत संपूर्ण घरटं विणतो. त्यात तो अनेक ठिकाणी कौशल्याने गाठी कशा मारतो ते पाहण्यासारखं असतं. नैसर्गिक ऊर्मीने कीटक, प्राणी, पक्षी त्याचं जीवन जगत असतात. उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी बहाल केलेली ही कला ते हजारो वर्षे तितक्याच कौशल्याने वापरत आलेत. खोपा विणत असताना मधल्या फुगीर भागात चिकणमातीचं सारवण आणि त्यावर कापसाची मऊ बिछायत अंथरायला सुगरण विसरत नाही. आपल्या संसाराची आणि संभाव्य पिढीची त्यांना काळजी असते. त्यांच्या सुंदर सह जीवनातूनच त्यांचा ‘झुलता बंगला’ तयार होतो!























































