
हिंदुस्थानातील वृत्तपत्र छायाचित्रकारितेचे जनक विश्वविख्यात फोटोग्राफर ‘पद्मश्री’ रघु राय यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रघु राय यांना दोन वर्षांपूर्वी प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांचा पोटाचा कॅन्सर बळावला. त्यातूनही ते बरे झाले. मात्र नंतर कॅन्सर मेंदूपर्यंत पसरला. वयोमानामुळे उपचारांवर मर्यादा आल्याने त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली. त्यातच त्यांचे निधन झाले.
आता पाकिस्तानमध्ये असलेल्या झांगमध्ये 1942 साली राय यांचा जन्म झाला. मोठय़ा भावाकडे फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर साठच्या दशकात त्यांनी फोटोग्राफी सुरू केली. नंतर ते ‘द स्टेट्समन’मध्ये नोकरीला लागले. त्यानंतर ‘द संडे’ आणि ‘इंडिया टुडे’ मासिकात काम केले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक छायाचित्रे टिपली. त्यांच्या फोटोग्राफीचे जगभर कौतुक झाले. टाइम, लाइफ, द न्यूयॉर्क टाइम्स, न्यूजवीक आणि द न्यूयॉर्कर अशा जागतिक पातळीवरच्या प्रकाशनांनी त्यांच्या छायाचित्रांची दखल घेतली.
मोदींनी दिला इंदिरा गांधींच्या छायाचित्राचा दाखला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ‘राय हे निःसंशय देशातील एक जबरदस्त फोटोग्राफर होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अशी अनेक संस्मरणीय छायाचित्रे टिपली, जी अनेक लेखांपेक्षाही प्रभावी होती. पुरुष नेत्यांच्या गराडय़ात बसलेल्या इंदिरा गांधी यांचे राय यांनी टिपलेले छायाचित्र मला महान वाटते,’ अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही राय यांना श्रद्धांजली वाहिली. ‘राय हे हिंदुस्थानी फोटोग्राफीमधील उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केलेले वार्तांकन हे हिंदुस्थानच्या दृश्यात्मक स्मृतीचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे.
18 पुस्तकांचा खजिना
हिंदुस्थानी लोक, संस्कृती आणि शहरांचे मूड, घटना टिपणाऱ्या पह्टोंचा संग्रह असलेली तब्बल 18 पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. बांगलादेश युद्धावरील छायाचित्रांसाठी राय यांना 1972 साली ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले होते. 2017 मध्ये त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला.
























































