
नसरापूर प्रकरणी सरकारच मुख्य आरोपी आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी जनतेनेच या सरकारला ताब्यात घेतले पाहिजे आणि सरकारचं एन्काऊंटर करायला पाहिजे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नसरापूरमधली पहिलीच घटना नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांविरोधात अत्याचार, हत्या आणि कायदा सुव्यवस्थेचे वाटोळे झालेले आहे. फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे होते, ती पार पाडली जात नाहीत. सातत्याने लहान मुलींवर अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे वाढत आहेत. आणि आमचे मुख्यमंत्री टिवल्या-बावल्या करत प्रचारासाठी पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तमिळनाडू येथे जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याची परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री 24 तासांत त्यांच्या राजकारणात अडकलेले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
काल मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली आणि लोकांचे हाल झाले. म्हणून मुख्यमंत्र्यांनी विनम्रपणे माफी मागितली. राज्यात झालेल्या मुलींवरील आणि महिलांच्या अत्याचाराच्या प्रकरणी त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. हे त्यांचं अपयश आहे याबाबत त्यांनी माफी मागायला पाहिजे होती. त्या पीडीत मुलीची आई ही कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल. तिच्या खात्यात देवेंद्र फडणवीस दीड हजार रुपये टाकत असतील. त्या दीड हजार रुपयांच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही दिला आहे का? तिने आता तोंड बंद करावे, आम्ही तिला 1500 रुपये देतो, हे आता राज्यात सुरू आहे. या राज्यातील माता आणि भगिनींनी या सरकारविरोधात बंड केले पाहिजे आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे. या 1500 रुपयांच्या बदल्यात तुम्ही त्या आईची भावना विकत घेतली का? या विरोधात विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. हे राज्य सामान्य लोकांसाठी राहण्यालायक राहिलेले नाही हे दुर्दैवाने म्हणावंस वाटतं. फक्त पैश्यांचा माज आणि सत्ता या बळावर हे राज्य सुरू आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे एक नराधम चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करू शकतो. आणि यासाठी सर्वस्वी राज्याचे सरकार आणि गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
सरकारने तिथल्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही. कायद्याचा धाक हा तुम्ही सामान्य जनतेला दाखवताय. ज्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज केला त्या जनतेचा काय दोष? सरकार नालायक आहे म्हणून ते मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावर उतरले. खरंतर या जनतेने या सरकारला ताब्यात घेतले पाहिजे. यात सरकारच आरोपी आहे. सरकार हे आरोपी क्रमांक एक आहे. अशा प्रकरणात राज्याचे गृहमंत्री, पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जातंय, किंवा पोलीस चालवले जात आहेत, पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहेत. सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, सरकारविरोधात खटला चालवायला पाहिजे. या प्रकरणी सरकारचं एन्काऊंटर करायला पाहिजे. हे सरकार नालायक आहे असे संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय बंडू जाधव हे एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत. अनेक संकटांमध्ये, फाटाफुटींमध्ये ते शिवसेने सोबत, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेले आहेत असे संजय राऊत म्हणाले. त्यांनी अशा प्रकारचे जर विधान केले असेल तर त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. मध्यंतरी दिल्लीमध्ये माझ्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली. तेव्हा अनेक खासदारांचे म्हणणे पडले की आम्ही मर मर मरतो, राब राब राबतो, कष्ट करतो. पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात. विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणताही निधी दिला जात नाही, विकासाची कामे केली जात नाहीत. हे सर्वच खासदारांचे दुःख आहे. हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केले आहे. हेही लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत याचे भान पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. लोकशाहीसाठी जे आमच्या पक्षातून निवडून आले नाही त्यांना विकासासाठी निधी द्यायचा नाही ही भाजपची नीती आहे. हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा, विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवरचा अन्याय आहे असेही संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे 50-50 कोटी रुपये निवडणुकीसाठी देतात. भाजप निवडणुकीसाठी 100 कोटी रुपये खर्च करतं, हा लुटलेला जनतेचा पैसा आहे, तो आम्ही लुटून दरोडे टाकून द्यायचा का? भाजपचं लोकसभा निवडणुकीचं बजेट 10 ते 15 हजार कोटी रुपये असतं. एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रात जास्त बजेट असते. मग हे पैसे कुठून येतात याचा विचार कोणी करतं का? याचा विचार खासदारांनीही केला पाहिजे. चोरीच्या आणि लुटीच्या पैशातून निवडणूक लढायच्या का? आणि ही लूट करण्यासाठी पक्षाच्या प्रमुखांनी खांद्यावर कुऱ्हाड टाकून लुटीसाठी जंगलात जायला पाहिजे का? हा आमच्या सारख्या लोकांना प्रश्न पडला आहे असे संजय राऊत म्हणाले.
भाजपने कधीही नारी वंदना केलेली नाही. भाजपसाठी नारी वंदना म्हणजे फक्त फोटोसाठी आणि निवडणुकीसाठी असते. आणि पैसे देऊन लाडकी बहीण सारखी योजना राबवणे आणि बिहारमध्ये 10 हजार रुपये महिलांना देणे एवढीच त्यांची नारी वंदना आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला.


























































