
कंपन्यांमधील वाद सोडविण्यासाठी लवादाची अनेक प्रकरणे मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जवळपास दशकापासून प्रलंबित आहेत. त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे कळताच सरन्यायाधीश सूर्य कांत यांना धक्काच बसला. उच्च न्यायालयात इतर खटल्यांचा प्रचंड ताण असल्यामुळे लवादाची प्रकरणे वर्षानुवर्षे सुनावणीसाठी येतच नसल्यावरून सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली.
एका कंपनीच्या खटल्याची लवकर सुनावणी घेण्याची विनंती करणारी याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्याविरोधात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत आणि जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्यास नकार देण्यामागील कारण ऐकून सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. उच्च न्यायालयासमोर गेल्या 10 वर्षांमध्ये लवादाची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे संबंधित कंपनीचे प्रकरण लवकर सुनावणीसाठी घेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. लवादाच्या माध्यमातून कंपन्यांमधील वाद लवकरात लवकर सोडविण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेमध्ये अशा प्रकारचा विलंब होत असल्यावर आपण केवळ चिंता व्यक्त करू शकतो, असे म्हणत सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याची मुभा दिली.
आंतरराष्ट्रीय तंटामुक्ती केंद्र बनण्याची महत्त्वाकांक्षा धोक्यात
कंपन्यांमधील वादविवाद सोडविण्यासाठी देशभरात लवाद नेमण्यात आले आहेत. मात्र वर्षानुवर्षे लवादासमोर प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय तंटामुक्तीचे केंद्र बनण्याच्या महत्त्वाकांक्षेला धोका निर्माण झाला आहे. जागतिक पातळीवरील टॉप 10 लवाद केंद्रांत हिंदुस्थानचे नाव नाही. सिंगापूर आणि लंडन ही शहरे अग्रस्थानी आहेत. न्यायालयांवरील ताण तसेच अंमलबजावणीतील खराब रेकॉर्डमुळे या यादीत हिंदुस्थानचे नाव कुठेच दिसत नाही.
























































