रोज भात खाल्ल्यामुळे खरोखर आपले वजन वाढते का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या आहारामध्ये कोणताही पदार्थ हा प्रमाणात खाण्याचे आरोग्यफायदे खूप असतात. अनेकांना भात खाल्ल्यावर वजन वाढते असे वाटते. मुख्य म्हणजे दररोज भात खाल्ल्याने वजन वाढते, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, फक्त भात खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही; तर एकूण कॅलरी, जीवनशैली आणि शारीरिक हालचाली यावर वजन अवलंबून असते.

हिंदुस्थानींच्या आहारामध्ये भात हा फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांना तर भात खाल्ल्याशिवाय जेवलोय असे वाटतच नाही. त्यामुळे भात हा आपल्या ताटातील अविभाज्य पदार्थ आहे.

भातामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. तसेच त्यात काही प्रमाणात प्रोटीन, बी-व्हिटॅमिन्स, आयर्न, मॅग्नेशियम आणि फायबरही आढळते. ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने तो अधिक पौष्टिक मानला जातो.

तज्ज्ञांच्या मते, एका वेळी एक वाटी भात पुरेसा असतो. त्यासोबत डाळ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थ घेणे गरजेचे आहे. रात्री जास्त प्रमाणात भात खाणे टाळावे.

भात पचायला हलका असल्यामुळे, लहानांसह प्रौढांनाही भात खाता येतो. तसेच तांदूळ हा ग्लूटेन मुक्त असल्याने, ज्यांना गव्हाची एलर्जी आहे अशांसाठी भात खाणे हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो.

ब्राऊन राइस हा सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा भात खाल्ल्याने हृद्याचे आरोग्य सुधारते, तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्राॅल कमी करण्यास मदत होते.

सोशल मीडियावरही अनेकांनी अनुभव शेअर करताना सांगितले की, फक्त भात नव्हे तर ओव्हरईटिंग आणि खराब लाइफस्टाइलमुळे वजन वाढते.