
विनातिकीट प्रवास करताना पकडल्यावर टीसीने दंड भरण्यास सांगितले असता प्रवाशाने धिंगाणा घातला. दंड भरणार नाही असे म्हणत प्रवाशाने अरेरावी करत टीसीला मारहाण केल्याची घटना धावत्या एक्सप्रेसमध्ये घडली. याप्रकरणी लोकमान्य टिळक रेल्वे पोलीस ठाण्यात परप्रांतीय प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकमलेंद्र तिवारी (25) असे त्या प्रवाशाचे नाव आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला तिवारी पुण्यातील एका इंटरनॅशनल कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी तो त्याच्या आईला एक्सप्रेसमध्ये बसविण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये गेला होता.
दरम्यान, त्या एक्सप्रेसमध्ये अमित कोळी (42) हे तिकीट तपासण्याचे काम करत होते. कोळी यांनी तिवारीला तिकीट विचारले. तेव्हा मी प्रवास करीत नसून आईला सोडायला आल्याचे तो म्हणाला. त्यामुळे कोळी यांनी त्याच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट विचारल्यावर तेही त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळे कोळी यांनी त्याला 300 रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावर संतापलेल्या तिवारीने वाद घालत कोळी यांच्या डोक्यात मारहाण केली.






























































