
तलावात पोहण्याचा मोह बहीण-भावासह चौघांच्या जिवावर बेतल्याची घटना अमरावतीतील धाटखेडा परिसरातून उघडकीस आली आहे. बंधाऱ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सोनाली जोशी (16), आदित्य जोशी (12), पाटील पंडित (21), यश काकणे (13) यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या धातखेडा बंधारा आहे. या बंधाऱ्यात खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार मुले पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे आपत्ती शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.




























































