लेख – करीअरचा यक्षप्रश्नः अभ्यास, परिश्रम हेच उत्तर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय पांढरीपांडे 

दहावी–बारावीपर्यंत आपल्याला बेसिक सगळे विषय थोड्या फार प्रमाणात समजले असतात. त्यानंतर मला काय आवडते? मला काय जमते? सोपे वाटते? मी काय करू शकतो? काय केल्याने मला आनंद मिळणार आहे? असे प्रश्न स्वतःला विचारत आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. कोणताही मार्ग सोपा नसतो. कोणताही विषय कठीण नसतो. प्रत्येक ठिकाणी साधना, अभ्यास, परिश्रम करावेच लागतात ही खूणगाठ विद्यार्थ्यांनी मनात बांधली तरच आपल्या करिअरच्या प्रश्नाचे उत्तर मिळते.

 दहावी-बारावीचे निकाल लागले की, विद्यार्थी-पालक यांच्यात सर्वात जास्त संभ्रम निर्माण करणारा प्रश्न असतो, पुढे काय करायचे? पदवीसाठी कोर्सेसची निवड हा एक यक्षप्रश्न झाला आहे. तसे पाहिले तर पूर्वीच्या तुलनेत आता बऱ्याच नव्या शाखा निर्माण झाल्या आहेत.त्यातही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात, नियमात, पद्धतीत बरीच लवचिकता आली आहे.आंतरशाखीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे अवतीभोवतीची एकूण परिस्थिती कुठल्याही क्षेत्रात बऱ्याच संधी असणारी अशी आहे. गरज आहे ती प्रामाणिकपणे मेहनत करण्याची, सातत्याने नवे शिकण्यास तत्पर राहण्याची. पूर्वी एकाच विषयात, शाखेत तज्ञ अशी परिस्थिती होती. आता तसे चालणार नाही.तुमच्या विषयाव्यतिरिक्त इतर शाखांची, त्यातील बदलांची, भविष्यकालीन गरजांची किमान माहिती असणे आवश्यक आहे.

शाळेत, कॉलेजात कोर्सेसची, विषयांची निवड करताना पूर्वापार चालत आलेला गोड गैरसमज आधार समजला जातो. गणित, सायन्स घेऊन इंजिनीअरिंग, मेडिकलकडे जाणारी मुले हुशार! त्यांच्या खालोखाल गुण मिळवणाऱ्यांनी कला, वाणिज्य घेऊन समाधान मानायचे! हा सपशेल चुकीचा समज आहे. अभ्यासाच्या सर्वच शाखा सारख्याच तोलामोलाच्या असतात.प्रावीण्य मिळविण्यासाठी, खोलात जाऊन अभ्यास करायचा तर प्रत्येक विषयासाठी सारखीच मेहनत घ्यावी लागते. तितकाच वेळ द्यावा लागतो.सारखेच परिश्रम घ्यावे लागतात, पण दुर्दैवाने समाजात जसे जातीधर्माचे वर्ग निर्माण झाले तसेच शिक्षण क्षेत्रातदेखील अशा पोलादी भिंतींनी बांधलेले भिन्न वर्ग तयार झाले. काही मुलांना यामुळे न्यूनगंड निर्माण होऊन त्रास होतो. शिक्षक, पालक…सगळेच हा भेदभाव निर्माण करण्यात सहभागी असतात. गणितात एकच उत्तर असते. सायन्समध्ये कृती ठरलेल्या असतात. पण कला, वाणिज्य, इतिहास यात एकाच विधानाचे, संकल्पनेचे वेगवेगळे अर्थ काढता येतात. गणिताची प्रमेये, समीकरणे, सायन्सची विधाने, व्याख्या, सूत्रे ही समजायला कठीण,किचकट, गुंतागुंतीची असतात हे खरे, पण ते काठिण्य इतर विषयांतदेखील असतेच. ग्रेसची कविता समजणे तितकेच कठीण. जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांतील प्रतिमांचे अर्थ लावून त्यांचे आकलन करणे तितकेच कठीण. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या संकल्पना, भारतीय अध्यात्म, इतिहासातील वेगवेगळ्या युद्धांचे, जयपराजय यांचे विश्लेषण हे वेगवेगळ्या अंगांनी बघितले तर विभिन्न निष्कर्ष निघू शकतात. गणित, सायन्स हे पायरीपायरीने चढत जाण्यासारखे. तिथे इच्छित स्थळी पोहोचता येते कष्ट घेतले तर.महाभारत, गीता यांचे विश्लेषण समजायला, पचवायला तितकेच कठीण. म्हणूनच गीतेवर कितीतरी भाष्ये लिहिली गेली. वेगवेगळे अर्थ काढले गेले.

कला, इतिहास, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र यात समजलेले स्वतःच्या भाषेत लिहावे लागते. भाषेवर त्यासाठी प्रभुत्व हवे. विज्ञान, गणिताची ठरलेली भाषा असते. सूत्रात, समीकरणात लिहिता येते. लेखन कौशल्य,संवाद कौशल्य यांची कसोटी लागते आर्ट्स, सोशल सायन्स अशा विषयांचे प्रश्न सोडवताना. तिथे भाषा कौशल्य, व्याकरण, विषयाची मुद्देसूद मांडणी… सारेच महत्त्वाचे असते. कठीणदेखील असते. ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे’ असे एक सुंदर काव्य वचन आहे. हा असा आशय शोधताना साहित्याच्या विद्यार्थ्यांनादेखील गणिताच्या विद्यार्थ्याइतकीच मेहनत घ्यावी लागते.सखोल अभ्यास करावा लागतो. मानवी स्वभाव, वर्तन समजून घेणारे मानसशास्त्रदेखील तितकेच गुंतागुंतीचे असते. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येक केस वेगळी असते. तिथे विशिष्ट पुस्तकी ठोकताळे कामी येत नाहीत. सध्याच्या युद्धाचेच उदाहरण घ्या. कुणीही छातीठोकपणे त्यामागची मूळ कारणे, भूमिका, त्यांचे दूरगामी परिणाम, कुणाचे काय फायदेतोटे हे सांगू शकणार नाही. आपल्या प्रत्येकाच्या भूमिका बायस्ड असू शकतात. हत्ती जसा सात आंधळ्यांना वेगवेगळा दिसतो, तसेच हे. मग या युद्धशास्त्राचा अभ्यास करणारे गणिती, शास्त्रज्ञ यांच्या पेक्षा कमी दर्जाचे कसे काय ठरवायचे? सुप्रीम कोर्टातला वकील आधीच्या निकालावर स्टे आणण्यासाठी पाच मिनिटेच युक्तिवाद करतो.पण त्याची त्या कामाची फी आयटी इंजिनीअरच्या मासिक पगारापेक्षा जास्त असते. पदवीधर नसलेला बिल्डर करोडोची कमाई करतो. त्याचीही समाजात तितकीच प्रतिष्ठा असते. त्यामुळे पाल्य-पालक यांनी या संभ्रमातून बाहेर आले पाहिजे. गणित, सायन्सला श्रेष्ठत्व देऊन इतर विषयांना कमी, दुय्यम लेखणे थांबवले पाहिजे.

कला, संगीत, नाट्य, साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र हे इतर विषय तितकेच महत्त्वाचे, तितकेच कठीण आहेत. खोलात जाऊन अभ्यासायचे ठरवले तर ! आता तर नव्या शैक्षणिक धोरणामुळे विषय निवडीत स्वातंत्र्य आले आहे. लवचिकता आली आहे. त्याचाही विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. एकाच विषयाचा, एकाच मार्गाचा एकांगी ध्यास न घेता ,आपल्या आवडत्या विषयासोबतच इतर सगळ्याच विषयात रस घेतला पाहिजे. खरे तर दहावी-बारावीपर्यंत आपल्याला बेसिक सगळे विषय थोड्या फार प्रमाणात समजले असतात. त्यानंतर मला काय आवडते? मला काय जमते? सोपे वाटते? मी काय करू शकतो? (काय करू शकत नाही?), काय केल्याने मला आनंद मिळणार आहे? असे प्रश्न स्वतःला विचारत आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. कोणताही मार्ग सोपा नसतो. कोणताही विषय कठीण नसतो. प्रत्येक ठिकाणी साधना, अभ्यास, परिश्रम करावेच लागतात ही खूणगाठ विद्यार्थ्यांनी मनात बांधली पाहिजे. तरच आपला पुढचा प्रवास सुखाचा, सुसह्य होतो. एरवी खाचखळगे हे प्रत्येक वाटेवर असतातच हेही नीट ध्यानात ठेवले पाहिजे. मी स्वतः गणित, सायन्सचा विद्यार्थी, इंजिनीअरिंगचा प्राध्यापक असून हे सगळे लिहितो आहे यातच सारे काही आले!

कोणतेही अभ्यासाचे, कामाचे क्षेत्र कमी दर्जाचे नसते. कामाला दर्जा आपल्या कार्यकर्तृत्वाने निर्माण करून द्यायचा असतो. अनेक क्षेत्रांत तर गरज असूनही योग्य व्यक्ती मिळत नाही अशी परिस्थिती आहे. उत्तम डॉक्टर, नर्सेस, शिक्षक, मानसोपचार तज्ञ, कलेचे अभ्यासक, संगणक क्षेत्रातील तज्ञ, सर्व्हिस प्रोव्हायडर, मेडिकल क्षेत्रात वृद्धांना सहाय्यक, संशोधक,सामाजिक शास्त्राचे अभ्यासक अशा अनेक क्षेत्रांत योग्य व्यक्तींची गरज आहे. इथे ‘योग्य’ शब्द महत्त्वाचा. ती हवी असलेली योग्यता तुम्हाला स्वतःत निर्माण करावी लागेल. त्यासाठी सातत्याने नवा अभ्यास करावा लागेल. याची तयारी असेल तर काळजीचे मुळीच कारण नाही. तुम्ही कोणता कोर्स घेता, कोणते विषय निवडता, तुम्ही कुठं प्रवेश घेता, तुम्हाला किती गुण मिळतात, या सगळ्या  गोष्टी मग दुय्यम ठरतात.तुम्ही काय करू शकता, तुमच्या काय स्किल्स आहेत, किती धमक आहे, तुमचे संवाद कौशल्य कसे आहे, मिळून मिसळून काम करण्याच्या बाबतीत तुमची किती तयारी, तत्परता आहे हे सगळे जास्त महत्त्वाचे गुण ठरतात. थोडक्यात, विस्तीर्ण आकाश तुमच्या पुढे आहे. पंख पसरून झेप घेण्याची फक्त गरज आहे. दहावी-बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे.