सुरक्षा परिपत्रकाविरोधात ट्रेन मॅनेजरचे आंदोलन, ऐन गर्दीच्या वेळेत मध्य रेल्वे बोंबलली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील अनेक दिवसांपासून ‘रडतखडत’ धावणाऱया मध्य रेल्वेची सेवा बुधवारी सायंकाळी ट्रेन मॅनेजर्सच्या आंदोलनामुळे पूर्णपणे कोलमडली. ऐन गर्दीच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे ट्रेन मॅनेजर्सनी आंदोलन पुकारले. त्यामुळे लोकलसेवेवर मोठा परिणाम होऊन वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. सीएसएमटीपासून कल्याणपर्यंत सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. लोकल तब्बल 30 ते 45 मिनिटे उशिराने धावल्याने घरी परतण्याच्या प्रवासात नोकरदारांचे अतोनात हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकलचे वेळापत्रक विस्कळीतच होते.

मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलचे प्लॅटफॉर्म ओव्हरशूट टाळण्यासाठी नवीन कार्यपद्धतीचे सुरक्षा परिपत्रक (करेक्शन स्लिप नं. 15) जारी केले आहे. त्याविरुद्ध ट्रेन मॅनेजर्समध्ये असंतोष निर्माण झाला असून त्याचे रूपांतर बुधवारी सायंकाळी आंदोलनात झाले. ट्रेन मॅनेजर्सनी सुरक्षा परिपत्रकाविरोधात ‘वर्प टू रूल’ आंदोलन केले. त्यांनी अचानक अतिरिक्त डय़ुटी करण्यास नकार दिला. आधीच ट्रेन मॅनेजर्सची संख्या अपुरी आहे. त्यात काही कर्मचाऱयांनी अतिरिक्त डय़ुटी न करण्याची भूमिका घेतल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत लोकलसेवा खोळंबली. सीएसएमटी येथून डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या तीन लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याव्यतिरिक्त अनेक लोकल फेऱया उशिराने धावल्या. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करीत ट्रेन मॅनेजरच्या वतीने सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने प्रशासनाला पत्र दिले आहे.

कुर्ला, घाटकोपर, दादर स्थानकात तुडुंब गर्दी

ट्रेन मॅनेजर्सच्या आंदोलनानंतर सर्वच स्थानकांत प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. दादर, घाटकोपर, पुर्ला यांसारख्या प्रमुख स्थानकांत प्रवाशांची तुडुंब गर्दी उसळली होती. घाटकोपर स्थानकात मध्य रेल्वे आणि मेट्रोच्या प्रवाशांच्या गर्दीने प्लॅटफॉर्मसह ब्रिजदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाले होते. हेच चित्र दादर स्थानकात दिसून आले. पुर्ला स्थानकात मेन लाईन आणि हार्बरच्या प्रवाशांची धावाधाव उडाली होती.

रेल्वे प्रशासन म्हणते, चर्चेतून तोडगा काढणार

ट्रेन मॅनेजर्सनी सुरक्षा परिपत्रकाविरोधात आंदोलन करून रेल्वे प्रशासनाचे आपल्या मागणीकडे लक्ष वेधले. त्यावर रेल्वे प्रशासनाने चर्चेतून तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले. ट्रेन मॅनेजरसोबत प्रशासनाची चर्चा सुरू आहे. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी स्वप्नील नीला यांनी स्पष्ट केले.

नवीन नियम काय आहे? 

नव्या नियमानुसार, गाडीचा थांबा असलेल्या स्थानकापूर्वी ट्रेन मॅनेजरने मोटरमनला एक बेल बीट देणे आवश्यक आहे. त्यानंतर मोटरमनने प्रतिसाद देत प्लॅटफॉर्मवर गाडी थांबवायची आहे. या नियमावर ट्रेन मॅनेजरने आक्षेप घेतला आहे.

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचा आक्षेप

नवीन कार्यपद्धती एकतर्फी पद्धतीने लागू केली असून मान्यताप्राप्त संघटनांना विश्वासात घेतले नाही, असे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.