
बोनी कपूर यांच्या नो एंट्री या चित्रपटातून वरुण धवनने माघार घेतल्याचे वृत्त आहे. वरुणच्या आधी दिलजीत दोसांझनेही हा चित्रपट सोडला होता. वरूण सध्या त्याच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वृत्तानुसार, वरुण धवन बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट थांबवण्यात आला आहे. तो पुढे चालू ठेवायचा की नाही यावर निर्मात्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. असेही वृत्त आहे की शाहिद कपूरला या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. त्याने कथा ऐकली आहे आणि लवकरच त्याला संपूर्ण स्क्रिप्ट सादर केली जाऊ शकते. परंतु त्यानेही यावर कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.
गेल्या वर्षी क्रिएटीव्ह मतभेदांचे कारण देत दिलजीत दोसांझने चित्रपटातून माघार घेतली होती. परंतु बोनी कपूर यांनी हे वृत्त खोटे ठरवत म्हटले की, “तारखांची अडचण आहे, पण कोणतेही क्रिएटीव्ह मतभेद नाहीत. आम्ही सर्वांच्या तारखा जुळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” अजूनही या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली नाही. असे वृत्त एबीपीने दिले आहे.
नो एंट्री चित्रपटाचा पहिला भाग 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये सलमान खान, अनिल कपूर, फरदीन खान, ईशा देओल, लारा दत्ता, बिपाशा बसु आणि सेलिना जेटली कलाकार होते. नो एंट्री हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपटांपैकी एक आहे. दुसऱ्या भागात, दिलजीत आणि वरुण बाहेर पडल्यानंतर अर्जुन कपूर चित्रपटात दिसणार आहे.
एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर म्हणाले, “हा एक प्रचंड क्षमता असलेला चित्रपट आहे. ज्यांनी ‘नो एंट्री 2’ ची कथा ऐकली आहे, त्या सर्वांचा विश्वास आहे की हा चित्रपट पहिल्या चित्रपटापेक्षाही चांगला आहे. पण आम्ही मूळ कलाकारांना पुन्हा एकत्र आणू शकलो नाही. मी खूप वेळ वाट पाहिली, पण प्रत्येकाची स्वतःची कारणे होती आणि मी त्यांचा आदर करतो. त्यामुळे, हा चित्रपट रिमेक करण्यात आला आहे.”






















































