अंतराळ – अंतराळातील नवी ‘दृष्टी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< गणेश काळे

भारतीय स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘दृष्टी’ या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आणि त्यानंतर भारतीय अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षमतेविषयी जागतिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली. नुकत्याच झालेल्या या उपग्रह प्रक्षेपणाने भारतीय तरुण संशोधकांची स्वावलंबी तंत्रज्ञान क्षमता सिद्ध केली आहे.

भारतीय अंतरिक्ष क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे परिवर्तन घडताना दिसत आहे. एकेकाळी केवळ सरकारी संस्थांच्या कक्षेत मानले जाणारे हे क्षेत्र आता खासगी उद्योग, नवउद्योग आणि तरुण संशोधकांसाठीही नवी दारे उघडत आहे. भारतीय स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘दृष्टी’ या उपग्रहाने या बदलाला नवे परिमाण मिळवून दिले आहे. अमेरिकेतील स्टारलिंकच्या रॉकेटद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आणि त्यानंतर भारतीय अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षमतेविषयी जागतिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

या उपग्रहाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रथम पारंपरिक उपग्रह संवेदकांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक ठरते. सामान्यत: पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपग्रह दोन प्रमुख तंत्रज्ञानांवर आधारित असतात. पहिले म्हणजे ऑप्टिकल संवेदक आणि दुसरे म्हणजे सिंथेटिक अपर्चर रडार अर्थात एसएआर तंत्रज्ञान.

ऑप्टिकल संवेदक हे साधारण कॅमेऱ्याप्रमाणे कार्य करतात. ‘दृष्टी’चे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही तंत्रज्ञानांचा एका उपग्रहात यशस्वी संगम घडवून आणण्यात आला आहे. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे ऑप्टिकल आणि एसएआर संवेदक एकाच वेळी एकाच स्थळाचे निरीक्षण करतात. गॅलेक्सीआयने या तंत्रज्ञानाला ‘ऑप्टोएसएआर’ असे नाव दिले आहे. पूर्वी या दोन तंत्रज्ञानांतील माहिती एकत्र करण्यासाठी वेगवेगळ्या उपग्रहांकडून वेगवेगळ्या वेळेला मिळालेल्या चित्रांचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे अनेकदा माहितीमध्ये विसंगती निर्माण होत असे. ‘दृष्टी’ने ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. एखाद्या वेळी ढग किंवा अंधारामुळे ऑप्टिकल संवेदक कार्य करू शकत नसल्यास एसएआर डेटाच्या आधारे ऑप्टिकलसदृश चित्रे तयार करण्याची क्षमता या प्रणालीत विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे उपग्रहातून मिळणारी माहिती अधिक सुलभ आणि व्यापक वापरासाठी उपयुक्त ठरू शकते. भविष्यात कृषी नियोजन, पूरस्थितीचे निरीक्षण, जंगलांवरील देखरेख आणि शहरी विस्ताराचा अभ्यास यासाठी या प्रकारची तंत्रज्ञान प्रणाली अत्यंत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

‘दृष्टी’ची निर्मिती मात्र तितकी सोपी नव्हती. ऑप्टिकल आणि एसएआर संवेदक पृथ्वीचे निरीक्षण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यांचे कोन, संकेत आणि प्रतिमा तयार करण्याची प्रक्रिया वेगळी असते. भारतातील वाढत्या खासगी अंतराळ संशोधन क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर ही उपलब्धी अधिक महत्त्वाची ठरते. चेन्नईस्थित अग्निकुल कॉसमॉसने थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन विकसित करून लक्ष वेधले, तर हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने खासगी रॉकेट प्रक्षेपणाच्या दिशेने मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर पिसेल (नवी दिल्ली), ध्रुवा स्पेस (हैदराबाद) और बेलाट्रिस एअरोस्पेस (बंगळुरू) यांसारख्या कंपन्याही उपग्रह आणि प्रणोदन तंत्रज्ञानात नवे प्रयोग करत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे भारतात वेगाने विकसित होणारी एक मजबूत अंतराळ अर्थव्यवस्था आकार घेत आहे.

भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशासाठी ‘दृष्टी’चे महत्त्व आणखी वाढते. मान्सूनच्या काळात सतत ढगाळ वातावरण असल्याने पारंपरिक ऑप्टिकल उपग्रहांना अनेक अडचणी येतात. अशा वेळी एसएआर तंत्रज्ञानावर आधारित निरीक्षण अधिक परिणामकारक ठरते. पूर, भूस्खलन, चक्रीवादळे आणि कृषी नुकसान यांचे वेगाने मूल्यांकन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण आणि जलस्रोत व्यवस्थापनासाठीही तिचा मोठा उपयोग होऊ शकतो.

‘दृष्टी’चे महत्त्व केवळ पृथ्वी निरीक्षणापुरते मर्यादित नाही. भविष्यात इतर ग्रहांच्या अभ्यासातही अशा मिश्र तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही या यशामुळे नव्या पिढीला विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाकडे आकर्षित करण्यास मदत मिळेल. भारतीय तरुणांमध्ये नवोन्मेषाची क्षमता किती मोठी आहे, याचा हा ठोस पुरावा मानला जात आहे.

‘दृष्टी’चे प्रक्षेपण हे भारतीय स्टार्टअप क्षेत्राच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. मर्यादित साधनसंपत्ती असूनही कल्पकता, संशोधन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करता येतो हे या यशाने सिद्ध केले आहे. भारतासाठी हा नव्या अंतराळ युगाचा प्रारंभ मानला जात आहे.

(लेखक संगणक तज्ञ आहेत. )