
लॉजिस्टिक बॉक्समध्ये ठेवलेले 5.28 कोटी रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची घटना चारकोप येथे घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी तीन सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे सोने व्यापारी आहेत. त्याच्या मालकीचा चारकोप येथे दागिने बनवण्याचा कारखाना आहे. त्या पंपनीत 30 कामगार आणि तीन सुरक्षा रक्षक काम करतात. त्या कारखान्यात नुकतेच 5 कोटी 28 लाखांचे सोन्याच्या बांगडय़ा बनवल्या होत्या. त्या एका लॉजिस्टिक बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. गेल्या आठवडय़ात एकाने तक्रारदार याना पगार देत नसल्याने नोकरी सोडून जात असल्याचा मेसेज केला. हा प्रकार त्याना संशयास्पद वाटला. त्याने मॅनेजरला पंपनीत पाठवले तेव्हा तेथे तिन्ही सुरक्षा रक्षक दिसले नाही. तसेच बांगडय़ांचा बॉक्स जागेवर नव्हता. मॅनेजरने याची माहिती तक्रारदाराला दिली. त्यानंतर तक्रारदाराने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारकोप पोलिसांनी तीन सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहेत.

























































