महिनाभरात पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाणार, जयंत पाटील यांचा गंभीर इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असतानाच येत्या महिनाभरात डॉलर शंभरी पार करेल आणि पेट्रोलचे दर 120 ते 130 रुपयांवर जातील, असा गंभीर इशारा राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिला आहे.

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळय़ात बोलताना जयंत पाटील यांनी देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक संकटाची तीव्रता पाहता देशात आपोआपच लॉकडाऊन लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. वाशीममध्ये नागरिक ड्रम घेऊन पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.

आर्थिक काटकसरीचा भाग म्हणून पंतप्रधानांनी आपला ताफा कमी करत दोन गाडय़ांवर आणला आहे. मुख्यमंत्री फडणवीसही दुचाकीवरून फिरायला लागले आहेत. त्यांचे अनुकरण राज्यातील इतर मंत्रीही करतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल अशी अपेक्षा करूया, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.