
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या ‘ड’ संवर्गातील कामगारांना जनगणनेच्या कामासाठी सक्ती केली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी मिळाल्यामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांची भेट घेत त्यांची या कामातून सुटका करावी व त्यांना जनगणनेचे काम देऊ नये अशी मागणी केली आहे.
जनगणनेच्या कामकाजासाठी ‘ड’ संवर्गातील कामगारांची नियुक्ती करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश असतानाही काही अधिकारी या आदेशांचे उल्लंघन करून ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामासाठी सक्ती किंवा जबरदस्ती करीत आहेत तशा तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. काही कामगारांना तांत्रिक व अन्य कारणांमुळे प्रगणक म्हणून कामकाज करणे शक्य नाही. त्या कामगारांनी योग्य अडचणींचा उल्लेख करून त्या संबंधित जनगणना अधिकारी व खातेप्रमुखांकडे लेखी विनंती केलेली आहे. त्यामुळे या कामगारांच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. तसेच कामगारांवर सक्ती न करण्याच्या संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष
डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे.



























































