डळमळलेल्या राष्ट्रवादीत ‘पीके’ची एण्ट्री, प्रशांत किशोर बनवणार पक्षाची रणनीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डळमळीत झाला आहे. सध्या तो कोण चालवतोय याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. आता राष्ट्रवादीत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणजेच ‘पीके’ यांची एण्ट्री झाली आहे. आगामी काळात राष्ट्रवादीचे मुख्य रणनीतीकार म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात ‘पीके’ यांच्यासोबत पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची बैठक झाली. सविस्तर चर्चेनंतर पक्षाच्या रणनीतीची धुरा ‘पीके’ यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम सुरू करणार आहेत. त्यासाठी त्यांच्याशी कायदेशीर करार केला जाणार असल्याचे सांगितले जाते. 2029 च्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची ही तयारी असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी ‘पीके’ यांच्याशी तीन वर्षांचा करार केला जाणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांनी या चर्चेबाबत खुलासा करताना सांगितले की, ‘पीके’ मुंबईत आले होते, त्यामुळे आम्ही त्यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. भविष्यात गरज भासेल तेव्हा आम्ही एकमेकांसाठी नक्कीच उपलब्ध राहू, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश न मिळाल्याने अजित पवार यांनी नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या संस्थेची मदत घेतली होती. अरोरा यांनी गुलाबी कॅम्पेन हाती घेऊन अजितदादांची एक वेगळीच प्रतिमा राजकारणात निर्माण केली होती. त्याचा फायदा राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत झाला होता.