Malaysia masters 2026 – मालविकाची विजयी सलामी; लक्ष्य, प्रणॉयला पराभवाचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानसाठी मालविका बनसोड आणि अश्मिता चालिहा यांनी आशेचा किरण दाखवला. महिला एकेरीत दोघींनी दमदार विजय मिळवत दुसऱया फेरीत धडक मारली, मात्र अन्य हिंदुस्थानी खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.

शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱया मालविका बनसोडने जर्मनीच्या जागतिक क्रमवारीतील 52 व्या क्रमांकाच्या वोन ली हिच्यावर तीन गेममध्ये मात केली. मालविकाने 21-17, 16-21, 21-9 अशा फरकाने सामना जिंकत आपला लढाऊ बाणा दाखवून दिला. आता दुसऱया फेरीत तिच्यासमोर डेन्मार्कच्या आठव्या मानांकित लाइन होजमार्प जार्सफेल्ड्टचे आव्हान असेल.

अश्मिता चालिहानेही इंडोनेशियाच्या थलिता रामधनी वीर्यवान हिला सरळ गेममध्ये 21-16, 21-13 असे पराभूत करत पुढील फेरी गाठली. आता तिची गाठ मलेशियाच्या गोह जिन वीशी पडणार आहे.

पुरुष एकेरीत मात्र हिंदुस्थानी आव्हानाला जबर धक्के बसले. आठव्या मानांकित लक्ष्य सेनला इंडोनेशियाच्या मोहम्मद जाकी उबैदिल्लाहकडून 17-21, 11-21 असा पराभव पत्करावा लागला. तर एच. एस. प्रणॉयने जपानच्या सहाव्या मानांकित कोदाई नाराओकाविरुद्ध तब्बल 80 मिनिटे झुंज दिली, मात्र अखेर त्याला 17-21, 22-20, 22-24 अशा फरकाने हार मानावी लागली.

महिला एकेरीत अनमोल खरबने डेन्मार्पच्या लाइन क्रिस्टोफर्सन जार्सफेल्ड्टला चांगली झुंज दिली. मात्र 21-13, 16-21, 19-21 अशा फरकाने तिला पराभव स्वीकारावा लागला.