
मुंबई-दिल्ली अतिजलद रेल्वे मालवाहू (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला देण्यात आला नाही. पालघर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून हा मोबदला मिळवण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनकडे (डीएफसीसी) पाठपुरावा करीत असले तरी त्यांना उडवाडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा पालघर जिल्ह्यातून जात असून सद्यस्थितीला या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला आले आहे. त्यानंतरही या प्रकल्पामध्ये जमीन संपादित करण्यात आलेल्या सुमारे ६० खातेदारांना अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. या खातेदारांचे एक ते दीड कोटी रुपयांपर्यंतचे मोबदले गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडले आहेत. डीएफसीसी कार्याल याच्या बेजबाबदार कारभारामुळे बाधित शेतकरी आदिवासी, बिगर आदिवासी, बागायतदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र सरकारने मालवाहतूक अधिक वेगवान आणि आधुनिक करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला असला तरी प्रत्यक्षात जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप होत आहे. अनेक खातेदारांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, सातबारा उतारे, वारस नोंदी आणि बँक तपशील या प्रकल्पाच्या सक्षम प्राधिकारी प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत.
परिपूर्ण असलेल्या या फायली डीएफसीसीच्या वित्त विभागात फिरत असून अंतिम मंजुरीच्या नावाखाली मोबदला अडकवून ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी मोबदल्याच्या अपेक्षेवर कर्जफेड, घरबांधणी, शेती विकास तसेच मुलांच्या शिक्षणाचे नियोजन केले होते. त्यांच्या अडचणींमध्ये वाढ आहे.
शेतकऱ्यांना वेळेत मोबदला मिळत नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रकल्पासाठी वेगाने कामे सुरू असताना बाधितांना मात्र न्याय दिला जात नाही. डीएफसीसी प्रशासनाकडे तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
आम्ही संबंधित प्रकरणे आमच्या स्तरावरून डीएफसीसीच्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. त्यांनी या प्रकरणांना मंजुरी देऊन पैसे वितरण करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया डीएफसीसी प्रकल्पाचे अधिकारी महेश सागर यांनी व्यक्त केली आहे.




























































