
>> संध्या शहापुरे
‘सदा सर्वदा देव सन्निध आहे.’ असे समर्थ म्हणतात त्यावर भाष्य करणारा हा तुकारामांचा अभंग पहा – ‘राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो ची जेविला उपवासी। धन्य धन्य ते शरीर, तीर्थाव्रतांचे माहेर। राम म्हणे करिता धंदा, सुख समाधी त्या सदा। राम म्हणे वाटचाली, यज्ञ पावला पावली।’ जेवताना प्रत्येक घासाच्या वेळी रामनाम जर घेतले तर त्याला उपवासाचेच पुण्य लागते. ज्याच्या शरीरास तीर्थांचे, व्रतांचे माहेरघर होण्याचे भाग्य लाभते, तो धन्य धन्य होय. रोजचा व्यवसाय करीत असताना राम राम असे नाम जर आपल्या मुखातून येत राहिले तर, समाधीचेच सुख आपल्याला मिळेल. वाट चालताना प्रत्येक पावलागणिक रामाचे नाव उच्चारले तर यज्ञ-याग केल्याचे श्रेय मिळेल. कोणत्याही भोगाच्या अथवा त्यागाच्या वेळी रामनाम जर मुखात असेल तर ते कर्म आपल्या अंगी लागणार नाही. आपण त्यापासून निर्लेप राहू. अशा प्रकारे जो रोज रोज रामनामाचा सतत जप करीत असतो तो, जीवनमुक्त होतो, असे संत तुकाराम म्हणतात. सतत तुमच्याबरोबर असलेला देव तुमच्या धारिष्टय़ाची परीक्षा घेतो पण त्यामागे त्याचा कृपाळू दयाळू भाव असतो. पूर्ण श्रद्धेने, विवेकाने, विचाराने जेव्हा आपण संकटाला सामोरे जातो तेव्हा रक्षण करण्यासाठी तो धनुर्धारी राम तुमच्या पाठीशी असतो.



























































