
अवघड चढण, बोगदे, धोकादायक वळणे आणि अपघातांचे डेंजर स्पॉट टाळले जाऊन सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी १ मे रोजी मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले. मात्र भय इथले संपत नाही अशीच बोरघाटाची अवस्था आहे. गेल्या १५ दिवसांत बोरघाटात तीन अपघात झाले. त्यात आठ गाड्यांचा चक्काचूर झाला. दोघांचा बळी गेला, तर चौघे अपघातात जायबंदी झाले आहेत.
खोपोली बायपास, ढेकू गावाजवळील तीव्र उतार, फुडमॉल, अंडा पॉइंट असे बोरघाटातील अपघातांना निमंत्रण देणारे डेंजर पॉइंट्स आहेत. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतरही अपघातांची मालिका थांबलेली नाही. गेल्या १५ दिवसांत तीन गंभीर अपघात झाले. यात दोघांचे बळी गेले. ठाणे जिल्ह्यातून जेजुरीला गोंधळ घालण्यासाठी निघालेल्या वन्हाडाचा अपघात झाला. त्यातील आठ जखमींना मंदिराऐवजी रुग्णालय गाठावे लागले.
खोपोली बायपास खोपोली बायपासजवळ गेल्या वर्षभरात १६ अपघात झाले असून १५ जणांना जीव गमवावा लागला आहे. ६७ वाहनांचे नुकसान झाले, तर ६१ जण जखमी झाले.
लायनर गरम, ब्रेक फेल अवजड वाहने बोरघाटातील लोणावळा, खंडाळा येथून उतारावरून जात असताना चाल कांना सारखा ब्रेक मारावा लागतो. या दहा ते बारा किमीच्या प्रवासात ब्रेकचे लायनर गरम होऊन ब्रेक फेल होतात त्यामुळे हमखास अपघात होतात. ३ मार्चला ब्रेक फेल झालेल्या कंटेनर इनोव्हाला दिलेल्या धडकेत कारमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. २१ एप्रिलला बॅटरी पॉइंटजवळ झालेल्या कार अपघातात तीन जण ठार झाले होते.
बोरघाटातील अमृतांजन पूल ते फूडमॉल या १५ किमीच्या अंतरावर स्कॅनर बसवण्यात आले. लेनची शिस्त व वेग मर्यादा न राखणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. रंबल स्ट्रीप्स, दिशादर्शक फलक बसवूनही अपघात थांबले नाहीत. परंतु आता मिसिंग लिंक सुरू झाल्याने या मार्गावरील वाहनांची संख्या कमी होऊन अपघातात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील आंबेनळी, ताम्हिणी, घोणसे, भोर, बोर व कशेडी हे घाट जणू ‘मृत्यूचे घाट’ बनले असून प्रवाशांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. घाटातील अरुंद रस्ते, कमकुवत झालेले संरक्षक कठडे, नियोजनाचा अभाव, विविध असलेले खड्डे यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. रस्त्यांसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना रायगड जिल्ह्यातील घाटांमध्ये मात्र अपघात वाढत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.





























































