
बकरी ईदचे निमित्त सांगून ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना दर्शनासाठी जाण्यास पोलिसांनी विरोध केल्याच्या निषेधार्थ आज किल्ल्याच्या पायथ्याशी शेकडो शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलन केले. हिंदूंवर दडपशाही का करता, असा सवाल करत शिवसैनिकांनी पोलिसांच्या जोरजबरदस्तीचा निषेध केला. दुर्गाडीवर आधी हिंदूंचा हक्क आहे, कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही, असा इशाराही शिवसेनेने दिला. यावेळी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना अटक करण्यात आली.
दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास हिंदूंना मज्जाव करण्यात येतो. मंदिरातील घंटाही कपड्यात बांधून ठेवण्यात येतात. याविरोधात १९८६ पासून शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले. ते सलग ४० वर्षे सुरूच आहे. आज शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी दुर्गाडी किल्ल्याकडे कूच केली, मात्र पोलिसांनी लाल चौकीतील गणेश मंदिराजवळच त्यांना अडवले. आम्हाला दुर्गाडीवर जाऊ द्या… आमचा तो हक्क आहे असे शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले, मात्र पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत शिवसैनिकांना रोखून धरले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील, अल्पेश भोईर, जिल्हा संघटिका रेखा कंटे, कल्याण शहरप्रमुख बाळा परब, हेमंत चौधरी, उल्हासनगर शहरप्रमुख शिवाजी जावळे, शहर संघटिका मीनल सुनीता लेखावळे, महिला संपर्कप्रमुख राजलक्ष्मी अंगारखे, नगरसेवक उमेश बोरगावकर, विशाल गारवे, निलेश खांबायत, संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, संतोष भोईर, विश्वनाथ जाधव, दिनेश शेट्टे, सुरेश सोनार, दशरथ तरे, विजय कोट, विलास भोईर, शत्रुकांत तरे, रूपेश भोईर, संतोष भोईर, विशाल पाटील, हेमंत पाटील, विकी कांबळे, हेमंत गायकवाड, राजीव दीक्षित, प्रथमेश पुण्यार्थी, भागवत बैसाणे, अमित मांजरेकर, अमोल गायकवाड, केदार शेरे, चिंतामणी निखारके, प्रवीण काबाडी, उदय गावडे आदी उपस्थित होते.
हे भाजप शिंदे गटाचे बेगडी हिंदुत्व
स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या भाजपने हिंदूंसाठी मंदिर बंद होत असताना मौन बाळगले आहे. हिंदुत्व ही भाजपची केवळ राजकीय गरज आहे. हिंदूंसाठी मंदिर बंद होत असेल तर मुख्यमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा संताप उपनेते विजय साळवी यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झाले, पण हा प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत. निर्णय घ्यायचाच असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गी लावता आला असता. पण बेगडी हिंदुत्वाचे मुखवटे पांघरलेल्यांकडून काय अपेक्षा करणार, असेही साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.























































