ठसा – पराग वेदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश पोवळे

गिरगावातील स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो तरुणांना एकत्र आणणारा, मराठीचा जागर करणारा, गुढीपाडवा स्वागत यात्रेचा प्रणेता पराग वेदक यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने निष्ठावंत संघ कार्यकर्ता, सव्यसाची शिक्षक, व्यक्तिचित्रण करणारा उत्कृष्ट लेखक आणि हाडाचा सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे. पराग वेदक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गिरगाव क्षेत्रातील बिनीचे स्वयंसेवक होते. अभाविपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थीदशेपासून सामाजिक कारकीर्द सुरू केली. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी पुण्यात सक्रिय काम केले. मुंबईत परतल्यानंतर विद्यार्थी क्षेत्रात काम करणारे वेदक हे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून गेले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पराग वेदक यांचे प्रेरणास्थान होते. अचूक निरीक्षण आणि मार्मिक कमेंट्स हा वेदक यांचा हातखंडा विषय होता. कोविडच्या काळात त्यांनी गिरगावातील अनेक व्यक्तींची चित्रणे शब्दांतून रेखाटली. त्यांच्या या लेखमालेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांचा आवाका आणि कामाचा झपाटाही मोठा होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या वेदक यांनी उदरनिर्वाहासाठी शिक्षकी पेशा स्वीकारून शिकवण्या घेतल्या. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. डोंबिवलीत गुढीपाडव्याची देशातील पहिली शोभायात्रा निघाली. अशीच भव्य शोभायात्रा मुंबईत निघून इथल्या कॉस्मोपॉलिटन जनतेला मराठी संस्कृतीचा हुंकार कळावा यासाठी वेदक झपाटून कामाला लागले. त्यांनी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील पहिली नववर्ष शोभायात्रा गिरगावात सुरू केली. अवघ्या मुंबईतील लाखो तरुण या शोभायात्रेत मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आणि मराठी वेषभूषेचा जागर करीत सहभागी झाले आणि ही शोभायात्रा जागतिक पातळीवर झळकली. प्रकृतीच्या कारणामुळे अलीकडे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या तरी गिरगावच्या कोळीवाडीतील छोटय़ाशा घरातून त्यांची तरुणाईशी संपर्क मोहीम सुरूच होती. अखेर मधुमेहाच्या आजारामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.