
महिन्यातून एकदा नव्हे, तर दोन वेळा पगार मिळाला तर… कशी काय वाटते कल्पना! ‘शादीडॉटकॉम’चे संस्थापक आणि शार्क टँक इंडियाचे परीक्षक अनुपम मित्तल यांनी मासिक वेतन प्रणालीऐवजी द्विमासिक (बाय-मंथली) पगार व्यवस्था सुरू करण्याचा सल्ला दिला आहे. लिंक्डइनवर त्यांनी केलेल्या पोस्टमुळे वेतन पद्धतीवर देशभर चर्चा रंगली आहे.
अनुपम मित्तल यांच्या मते, देशातील बहुतेक कंपन्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 5 किंवा 7 तारखेला पगार देतात. काही कंपन्या 1 तारखेला पैसे जमा करतात तरीही आठवड्याच्या शेवटी बँक सुट्टी किंवा इतर कारणांमुळे विलंब होतो. मित्तल यांनी सुचवलेल्या नव्या पद्धतीनुसार कंपन्यांनी महिन्यात दोन वेळा पगार द्यावा. पहिला हफ्ता 15 तारखेला आणि दुसरा 30 तारखेला. महिन्याच्या मध्यावर पैसा मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे मासिक बजेट बिघडणार नाही. छोट्या-मोठ्या खर्चांसाठी क्रेडिट कार्ड किंवा कर्ज अॅप्सवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.































































