व्हीगन खाद्य पदार्थांना मिळणार स्वतंत्र ओळख, 1 जुलै 2027 पासून नवीन लोगो बंधनकारक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हीगन खाद्य पदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अशी उत्पादने सहज ओळखता येणार आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने व्हीगन खाद्य पदार्थांसाठी प्रमाणित लोगो जाहीर केला असून 1 जुलै 2027 पासून सर्व मान्यताप्राप्त व्हीगन उत्पादनांच्या पॅकेजिंगवर हा लोगो लावणे बंधनकारक असणार आहे.

सुधारित ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् रेग्युलेशन्स’नुसार प्रत्येक मान्यताप्राप्त व्हीगन उत्पादनावर हिरव्या रंगातील ‘व्हीगन’ लोगो दाखवावा लागेल.

नव्या लोगोमध्ये हिरव्या चौकटीत पानासह ‘व्ही’ हे चिन्ह असून संबंधित उत्पादन व्हीगन मानकांनुसार प्रमाणित असल्याचे आणि त्यामध्ये कोणताही प्राणिजन्य घटक नसल्याचे दर्शविले जाईल. एफएसएसएआयने 21 मे 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे या लोगोचा वापर आणि त्यासंबंधीचे निकष निश्चित केले आहेत.

व्हीगन म्हणजे काय

व्हीगन खाद्य पदार्थांमध्ये कोणतेही प्राणिजन्य घटक नसतात. शाकाहारी पदार्थांमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, तूप, पनीर किंवा मधाचा समावेश असू शकतो. मात्र व्हीगन पदार्थांमध्ये अशा सर्व प्राणिजन्य घटकांना पूर्णपणे वगळले जाते. त्याऐवजी फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, सुका मेवा, बिया आणि वनस्पतीजन्य दुधाचे पर्याय यांचा समावेश असतो.