
दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘शिवाजी कॉलेज’मध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला शिक्षिकेची तिच्याच घरात हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘देवस्मिता पॉल’ असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या पूर्व दिल्लीतील वसुंधरा एन्क्लेव्ह परिसरातील ‘सत्यम अपार्टमेंट्स’मध्ये एकट्याच राहत होत्या, तर त्यांचे पती बेंगळुरू येथे राहतात.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे 2.35 वाजता न्यू अशोक नगर पोलीस ठाण्याला या घटनेबाबत एक फोन आला. देवस्मिता यांच्या 49 वर्षीय बहीण देवराली पॉल यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. देवस्मिता या सकाळपासून कोणाचाही फोन उचलत नव्हत्या आणि त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने बहीण देवराली तात्काळ बहिणीच्या घरी पोहोचल्या आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी देवस्मिता या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आल्या.
डोक्यावर गंभीर वार, मनगटाच्या शिरा कापल्या
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, हा घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. देवस्मिता यांच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या मनगटाच्या शिराही कापलेल्या अवस्थेत आढळल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एलबीएस (LBS) रुग्णालयात पाठवला आहे.
या हत्येमागे चोरी किंवा लुटमारीचा उद्देश नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या तपासात घरातील दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू जशाच्या तशा सुरक्षित असल्याचे आढळून आले. घराचे कुलूप बाहेरून लावलेले असणे आणि लुटमार न होणे, यामुळे हा खून कोणा ओळखीच्या व्यक्तीने किंवा वैयक्तिक वैमनस्यातून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































