
मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनेतून उभ्या राहिलेली पहिल्या इमारतीला आता पुनर्विकासाचे वेध लागले आहेत. दादर पश्चिम येथील सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासासाठी हालचाली सुरू झाल्या असून सरकारने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.
दादर पश्चिमेला फुलमार्केट जवळ असलेल्या सुंदरनगर झोपडपट्टीत 310 कुटुंबे वास्तव्यास होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील 40 लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याच्या योजनेचा शुभारंभ 1995 साली सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी करण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी आणि गृहनिर्माण मंत्री चंद्रकांत खैरेदेखील यावेळी उपस्थित होते. पुनर्विकासात रहिवाशांना 225 चौरस फुटांचे घर देण्यात आले.
या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याची हालचाल सुरू आहे. हा पुनर्विकास तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागप्रमुख – आमदार महेश सावंत यांनी रविवारी सुंदरनगर येथे भेट देऊन पदाधिकाऱयांशी चर्चा केली. त्यावेळी सुंदरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव डॉ. श्रीनिवास वड्डेपल्ली, अध्यक्ष समाधान पारकर, सूर्यकांत लाडे, शाखाप्रमुख प्रवीण नरे, विजय लोखंडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.































































