
दापोली तालुक्यातील गव्हे येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. झोपेत असताना झालेल्या विषारी सर्पदंशामुळे एका 45 वर्षीय उच्चशिक्षित विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिप्ती जितेंद्र काजरेकर असे या दुर्दैवी महिलेचे नाव असून, त्यांच्या अकाली जाण्याने दोन लहान मुलांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे गव्हे गावासह संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी हे माहेर असलेल्या दिप्ती काजरेकर या गव्हे येथे आपल्या कुटुंबासह राहत होत्या. शनिवार, 6 जून रोजी रात्री त्या नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबासमवेत झोपल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास एका विषारी सापाने त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांची प्रकृती वेगाने खालावू लागली. प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दापोली येथील खासगी हॉस्पिटल’मध्ये नेले. मात्र, दुर्दैवाने त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना त्यांना घेऊन दापोली उपजिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागली. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, परंतु विष अंगात जास्त भिनल्याने त्यांच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दिप्ती काजरेकर या केवळ घर सांभाळणाऱ्या गृहिणी नव्हत्या, तर त्या उच्चशिक्षित होत्या. गव्हे येथील घराशेजारीच त्यांचे दुकान होते. याशिवाय त्यांना लोकरीच्या हस्तकलेची उत्तम आवड आणि ज्ञान होते. त्यांनी बनवलेली लोकरीची सुंदर तोरणे परिसरात कौतुकाचा विषय असायची. त्यांच्या पश्चात पती, दोन लहान मुले, सासू-सासरे आणि दीर असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने काजरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक सर्पमित्र किरण करमरकर आणि सुरेश खानविलकर यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास काजरेकर यांच्या घरी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना तिथे एक विषारी ‘नाग’ आढळून आला. सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने या नागाला सुरक्षितरीत्या पकडून त्याचे रेस्क्यू केले, ज्यामुळे परिसरातील इतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. या धक्कादायक घटने संदर्भात दीपक भिकू बेनेरे यांनी दापोली पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, पोलिसांनी या प्रकरणाची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी श्री. नलावडे करत आहेत.
























































