युसुफ पठान तुम्ही देशासाठी खेळलायत, थोडी तरी लाज बाळगा; महुआ मोईत्रा यांनी फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांच्या एका गटाने भाजप प्रणित ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. त्याबाबतचे पत्र ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार आहेत. या खासदारांमध्ये टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण देखील आहेत. युसुफ पठाण हे देखील बंडखोर गटासोबत गेल्यामुळे तृणमूल खासदार महुआ मोईत्रा या त्यांच्यावर भडकल्या आहेत. मोईत्रा यांनी X वरून एक पोस्ट शेअर करत युसुफ पठाण यांना फटकारले आहे.

युसुफ पठाण हे तृणमूल काँग्रेसचे बेहरामपूर मतदारसंघाचे खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या काकोली घोष दस्तिदार यांनी आज 20 खासदार एनडीएला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. त्या 20 खासदारांमध्ये युसुफ पठाण देखील आहेत. त्यावरून महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

”युसुफ पठाण तुम्ही अमित शहांच्या एका हाकेवर दिल्लीला पळत आहात. थोडी तरी हिंमत ठेवा. तुम्ही देशासाठी खेळलेले आहात. आपल्या जिल्ह्याने तुमच्यासाठी मोठ्या मताधिक्याने तुम्हाला जिंकवले आहे. थोडी तरी शरम बाळगा. तुम्हाला पाठिचा कणा आहे की नाही”, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.

यासोबतच महुआ मोईत्रा यांनी इतर बंडखोर खासदारांना देखील फटकारले आहे. ”तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर 2024 मध्ये जे खासदार जिंकून आले त्यांना मिळालेली मतं ही NDA साठी नव्हती. सर्व स्वार्थी गद्दार लोकं आता भाजपमध्ये सामिल होती. तुम्ही आता राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकीटावर निवडून या. बघू किती मोठे हिरो आहात तुम्ही”, असे महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले आहे.

तृणमूलच्या 20 खासदारांचा ‘एनडीए’ला पाठिंबा; लोकसभा अध्यक्षांना पत्र; काकोली घोष दस्तिदार यांची माहिती