
भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी अमृतसर येथे ऑपरेशन ब्ल्यू स्टार संदर्भात केलेले वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, राष्ट्रहिताला बाधा आणणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यालाच कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशविरोधी भूमिका घेणाऱ्या गिरीश महाजन यांची तात्काळ मंत्रिमंडळातून व भाजप पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कोणत्याही धर्माविरोधातील कारवाई नव्हती, तर भारताचे तुकडे करण्याचे कारस्थान रचणाऱ्या सशस्त्र खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्यदलाने राबविलेली अत्यंत कठीण आणि आवश्यक मोहीम होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही देशाच्या एकता व अखंडतेला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला होता. त्यानंतर खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. या मोहिमेचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल अरुणकुमार वैद्य यांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य करून त्यांची हत्या केली. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वांच्या त्यागाचा अवमान करण्याचे काम गिरीश महाजन करत आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाने भारतीय जनता पक्ष व रा. स्व. संघाची राष्ट्रविघातक प्रवृत्ती समोर आली आहे. इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबविले नसते तर देशाचे तुकडे पडले असते, देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजी यांना बलिदान द्यावे लागले त्यावरही महाजन शंका उपस्थित करतात हे अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. विशेष म्हणजे देशाचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या कारवाईशी संबंधित सुरक्षा मोहिमांमध्ये सहभागी होते. मग गिरीश महाजन त्यांच्या भूमिकेचाही निषेध करणार आहेत का? त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहेत का? त्यांच्यात ती हिंमत आहे का, असा सवाल सपकाळ यांनी केला.


























































