
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे गावात आज ‘ओंकार’ नावाच्या जंगली हत्तीने थेट भरवस्तीत हजेरी लावल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावात अचानक हत्ती आल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली. भरवस्तीत हत्ती आल्याने ग्रामस्थांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाची धाव, सुरक्षेचे आवाहन
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तात्काळ झोळंबे गावात दाखल झाले आहे. हत्तीचा मानवी वस्तीतील वावर लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वन विभागाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.
वन विभागाचा इशारा: “हत्तीच्या जवळ जाणे, त्याला विनाकारण चिथावणी देणे किंवा त्याचे फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ग्रामस्थांनी हत्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे आणि वन विभागाच्या पथकाला सहकार्य करावे.”
गावात भीती आणि कुतूहलाचे वातावरण
सध्या मानवी वस्तीत आलेल्या या हत्तीला पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






























































