
पाकिस्तानी लष्कराच्या लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत नागरिकांच्या निवासी भागांवर बॉम्बहल्ला केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या मोठ्या हल्ल्यात 13 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 11 लहान मुले, एक महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने या सर्व मृतांना शहीद घोषित केले असून, या हल्ल्यात अन्य 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तान च्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी विमानांनी कुनार, खोस्त आणि पक्तिका प्रांतांना प्रामुख्याने लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक नागरिकांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अफगाणिस्तानने या कारवाईला आपल्या सार्वभौमत्वाचे थेट उल्लंघन म्हटले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, या घटनेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले असून हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानवर अफगाणिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे उल्लंघन केल्याचा थेट आरोप केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत बोलताना हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतानेनी यांनी या हवाई हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, या लष्करी कारवाईमुळे मोठ्या संख्येने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून हे आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र सनदेचे उघड उल्लंघन आहे. केवळ लष्करी कारवाईचे नाव देऊन निष्पाप नागरिकांच्या हत्याकांडाची जबाबदारी टाळता येऊ शकत नाही, अशा कडक शब्दांत हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावले आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेला मोठा धोका निर्माण झाल्याचेही हिंदुस्थानने स्पष्ट केले.




























































