
नेवासा तालुक्यातील जुन्या भालगाव परिसरात असलेल्या गोदावरी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या बाप लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. भास्कर देवराव तनपुरे (वय ५०) सार्थक गणेश निमसे (वय १६) अशी मृतांची नावे आहेत
याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी की, गोदावरी लगत जुने भालगाव आहे. या नदीजवळच रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून व आता अधिकमासाच्या दर सोमवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रम होत असतात. रात्री भजन, किर्तन होतात. महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी रात्रीचा स्वयंपाक बनविण्यासाठी गावातील भास्कर देवराव तनपुरे वय ५० सार्थक गणेश निमसे वय १६ हे दोघे रामेश्वर मंदिरात आले होते.
उन्हाच्या तडाख्यात दुपारी 2वा. सुमारास तनपुरे हे अंघोळीसाठी नदीवर गेले होते . त्या पाठोपाठ सार्थक गणेश निमसे हाही त्यांच्या मागे नदीवर गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्या नंतर हे दोघे पुन्हा मंदिरात आलेच नाही. कुठे काम निघाले असेल म्हणून भजनी मंडळींनीदेखील त्यांची विचारपूस केली नाही. घरच्यांना वाटले हे मंदिरात असेल म्हणून त्यांनीही विचारपूस केली नाही.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.९)सकाळी ७ वाजताच्या सुमारास नदीच्या काठावर दोघांचे कपडे व पाण्यात त्यांचे मृतदेह तरंगताना काही तरूणांना दिसल्याने ही घटना लक्षात आली. मंगळवारी दुपारी ४.वा. दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.






























































