
यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सर्वांच्या नजरा या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असतील. कारण रोनाल्डो आता सहावा वर्ल्ड कप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मात्र आता एक वाईट बातमी आली आहे आणि ती म्हणजे या दिग्गजाचा फॉर्म. पोर्तुगालचा सराव सामना नायजेरियाबरोबर झाला. या सामन्यात पोर्तुगालने विजय मिळवला असला तरी रोनाल्डो मात्र हरल्याचे पाहायला मिळाले. कारण या सामन्यात रोनाल्डोने दोन गोल करण्याच्या सुवर्णसंधी चालून आल्या होत्या, पण यामधील एकाही संधीचे सोने त्याला करता आले नाही. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी रोनाल्डोचे चाहते निराश झाले आहेत.
रोनाल्डोने गमावलेल्या संधी
रोनाल्डोला नायजेरियाविरुद्ध गोल करण्याच्या बऱयाच संधी मिळाल्या. काही वेळा तर त्याच्यासमोर फक्त गोलकिपरच होता. पण ही साधी संधीही त्याला साधता आली नाही. सामन्याच्या नवव्या मिनिटाला त्याला एक सुंदर पास मिळाला आणि त्याच्यासमोर फक्त गोलकिपरच होता. रोनाल्डो सहजपणे गोल करेल असे वाटत होते, पण त्याने ही सोपी संधी गमावली. त्यानंतर सामन्याच्या 50 व्या मिनिटालाही त्याला गोल करण्याची संधी साधून आली होती. रोनाल्डोला हेडर करून एक सहज गोल करता आला असता. पण त्याला चेंडू आपल्या डोक्यावर घेताच आले नाही. कारकीर्दीत 143 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱया खेळाडूच्या बाबतीत असे घडणे धक्कादायक आहे. तो सामन्याच्या दोन्ही सत्रांमध्ये गोल करू शकला नाही. त्यानंतर 65 व्या मिनिटाला त्याला बदली खेळाडू म्हणून बाहेर काढण्यात आले.
पोर्तुगालचा दमदार विजय
रोनाल्डो अपयशी ठरला असला तरी पोर्तुगालने मात्र हा सराव सामना जिंकला. पोर्तुगालने या सामन्यात नायजेरियाचा 2-1 असा पराभव केला. पोर्तुगालने 23 व्या मिनिटाला आघाडी घेतली. 14 मिनिटांनंतर नायजेरियाने अकोर ऍडम्सच्या गोलच्या जोरावर सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर दुसऱया सत्रामध्ये पोर्तुगालने आणखी एक गोल केला. फ्रान्सिस्को कॉन्सेसाओने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरून निर्णायक क्षणी गोल केला, पण यावेळी पोर्तुगालच्या विजयापेक्षा रोनाल्डोच्या अपयशाची चर्चा चांगलीच रंगली होती. रोनाल्डोने ज्या दोन गोल करण्याच्या सुवर्णसंधी दवडल्या त्यांचे व्हिडीओ जोरदार व्हायरल झाले आहेत.

























































