चोरीच्या बाईकवरून चेन स्नॅचिंग,  दोन इराणींवर झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन स्नॅचिंगचा डाव साधण्यासाठी चोरटे कोणती शक्कल लढवतील याचा भरवसा नाही. उल्हासनगरातील दोन इराणी चोरांनी तर चेन स्नॅचिंग करण्यासाठी चक्क चोरीच्या मोटरसायकलीचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हुसेनी मुख्तार इराणी उर्फ गजनी व गुलाम अब्बास अमिरअली इराणी अशी त्यांची नावे असून पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अटक केलेल्या इराणी चोरट्यांनी आठ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्या. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात हुसेनी मुख्तार इराणी उर्फ गजनी हा शाहाड–आंबिवलीकडे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती हवालदार शेखर भावेकर यांना प्राप्त झाली होती.

सापळा रचून कारवाई

सापळा रचून शिताफीने गजनी याला ताब्यात घेतले. त्याने जबरी चोरी करून लुटलेले सोन्याचे मंगळसूत्र हे त्याचा मित्र गुलामअब्बास अमिरअली इराणी याच्याकडे दिल्याची माहिती दिली. त्यानुसार गुलाम अब्बास अमिरअली इराणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.