
ठाण्याची चौपाटी असलेल्या तलावपाळीवर रक्तरंजित थरार झाला. अवघ्या तीन हजार रुपयांच्या वादातून मजुराची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुबारक शेख असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी आरोपी बबलू पवार याला ताब्यात घेतले.
मूळच्या उत्तर प्रदेश येथे राहणारे मुबारक शेख हे तलावपाळी परिसरात वास्तव्यास होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी बबलू पवार यांच्याकडून जबदस्तीने तीन हजार रुपये खेचून घेतले. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास अहिल्याघाटाजवळ दोघे जण भेटले. मात्र त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की बबलूने मुबारकला दगडाने ठेचले. या हल्ल्यात मुबारक गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या
हत्येची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी बब्लूच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



























































