FIFA World Cup 2026 – फुटबॉल किंग ब्राझीलपुढे मोरोक्कोचे तगडे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या अवघ्या जगाला फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा फिव्हर चढला आहे. उद्या होणाऱया सामन्यांमध्ये न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर पाच वेळा विश्वविजेते ब्राझील आणि आफ्रिकेतील बलाढय़ संघ मोरोक्को एकमेकांशी भिडणार आहेत. चार वर्षांपूर्वी कतारमध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ब्राझीलचा संघ उत्सुक असतानाच मोरोक्को संघाचे तगडे आव्हान ब्राझीलपुढे असणार आहे. पण या सामन्यात नेमार ज्युनिअर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात ब्राझील सर्वात यशस्वी देश आहे. त्यांनी सर्वाधिक सामने (114) खेळले आहेत, सर्वाधिक सामने (74) जिंकले आहेत आणि सर्वाधिक वेळा (पाचदा) विजेतेपद पटकावले आहे. तरीही 2002 नंतर त्यांना विश्वचषक करंडक उंचावता आलेली नाही. त्यामुळे हा 24 वर्षांचा हा दुष्काळ दूर करून विजेतेपद पटकावण्यासाठी ब्राझीलचा संघ सज्ज झाला आहे. फिफाच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला ब्राझीलचा संघ मोरोक्कोविरुद्धच्या शनिवारी होणाऱया सामन्यासाठी तयार झाला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन देश ठरल्यानंतर चार वर्षांनी, मोरोक्को आता आंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या सातव्यांदा सहभागी होण्यासाठी सज्ज होत आहे. स्पर्धेत पुन्हा एकदा मोठी मजल मारण्याची क्षमता असलेल्या मोरोक्कोचे तगडे आव्हान ब्राझीलपुढे असणार आहे.

स्कॉटलंडसाठी सोपा पेपर, हैतीबरोबर सामना

उद्या रंगणाऱया तिसऱया सामन्यात सीगटातील हैती आणि स्कॉटलंड हे दोन संघ मैदानात उतरणार आहेत. मात्र या सामन्यात स्कॉटलंडपुढे त्यांचा प्रमुख मिडफिल्डर स्कॉट मॅकटोमिनी याच्या तंदुरुस्तीची प्रमुख समस्या उभी ठाकल्याने चिंतेचे वातावरण आहे. दुखापतीमुळे बिली गिलमोर आधीच विश्वचषकातून बाहेर पडला असल्याने मॅकटोमिनीच्या तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली जात आहे.

 स्वित्झर्लंड आता कतारशी भिडणार

उद्या ‘ब’ गटामध्ये कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यात सांता क्लारा येथे तुल्यबळ सामना रंगणार आहे. 2022 मध्ये यजमान म्हणून सहभाग घेतल्यानंतर कतार दुसऱयांदा विश्वचषक स्पर्धेच्या मैदानात उतरत आहे. दुसरीकडे, स्वित्झर्लंडचा विश्वचषक स्पर्धेतील हा 13 वा सहभाग असेल. मागील तीनही विश्वचषक स्पर्धेमध्ये स्वित्झर्लंडने ‘राऊंड ऑफ 16’ पर्यंत धडक मारलेली आहे. त्यामुळे उद्या कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळेल यात शंका नाही. कॅनडा आणि बोस्निया-हर्झगोव्हिना या संघांचा समावेश असलेल्या ‘ब’ गटातून पहिला विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. कतारने यापूर्वी केवळ एकदाच स्वित्झर्लंडचा सामना केला असून, त्या सामन्यात कतारने 1-0 असा विजय नोंदवला होता.

 ऑस्ट्रेलियाची तुर्कीएशी सलामी लढत

चौथ्या सामन्यात बीसी प्लेस येथे 2026 विश्वचषकातील एक रोमांचक सामना रंगणार आहे. ज्यामध्ये ‘ड’ गटातील ऑस्ट्रेलियाचा सामना तुर्कीएशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाने गेल्या पाचही विश्वचषकांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे 2026 च्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवणे ही काही आश्चर्यकारक बाब नाही. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी केवळ दोनदाच मैत्रीपूर्ण लढतीत तुर्कीएचा सामना केला आहे. या दोन्ही सामन्यांत तुर्कीएने अनुक्रमे 3-1 व 1-0 अशा फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे तुर्कीएचे तगडे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, तुर्कीएचा संघ विश्वचषकात केवळ तिसऱयांदा खेळत आहे. 2002 नंतरची ही त्यांची पहिलीच स्पर्धा आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून विश्वचषक स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी तुर्कीएचा संघ सज्ज झाला आहे.

जर्मनीला नामुष्की टाळावी लागेल, कुरासाव करणार दोन हात

पाचव्या सामन्यात रविवारी जर्मनीचा संघ कुरासाव विरुद्ध मैदानात उतरून विश्वचषक स्पर्धेची धडाक्यात सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. जर्मनीची गेल्या दोन विश्वचषकांत निराशाजनक कामगिरी झाली आहे. 2018 आणि 2022 अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धांमध्ये जर्मनी साखळी फेरीतच गारद झाली होती. त्यामुळे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा अनपेक्षित निकालांपैकी एक ठरू शकणाऱया उद्याच्या सामन्यात कुरासाव विरुद्ध पराभवाची नामुष्की टाळण्याचे आव्हान जर्मनी पुढे असणार आहे, तर दुसरीकडे कुरासाव संघावर उद्याच्या सामन्याचे कोणतेही दडपण नसल्याने ते जर्मनी विरुद्ध तगडे आव्हान उभे करू शकतात.