
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ)ने हिंदुस्थानच्या संरक्षण क्षमतेत आणखी एक मोठी भर घातली आहे. डीआरडीओने नुकतीच बहुस्तरीय बॅलिस्टिक मिसाइल डिफेंस प्रणाली आणि नवीन नौदलासाठी अँटी-शिप मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. यामुळे आता हिंदुस्थानच्या दिशेने हवेतून येणाऱ्या आणि समुद्रात लपलेल्या दुश्मनाची खैर नाही. हिंदुस्थानच्या दिशेने येणारा मारा परतवून लावण्याची ताकद या चाचणीमुळे हिंदुस्थानला मिळणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लागोपाठ तीन उड्डाण चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचणीत बहुस्तरीय बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स प्रणालीचे यशस्वी प्रदर्शन केले आहे. या चाचणीत इंटरसेप्टर मिसाइलने आपल्या निर्धारित लक्ष्यांना योग्य निशाना बनवून नष्ट केले. ही प्रणाली आधुनिक टेक्नोलॉजीने विकसित केली आहे. याचा उद्देश भविष्यात समोर आलेल्या मिसाइलचा धोका ओळखून तो नष्ट करणे हा आहे. या नव्या चाचणीमुळे समुद्रातील सुरक्षा आणखी भक्कम होईल, असे संरक्षण तज्ञांना वाटत आहे. या चाचणीशिवाय डीआरडीओने पहिल्यांदा नौदल अँटी-शीप मिसाईल मीडियम रेंजची यशस्वी चाचणी केली. ही मिसाईल हिंदुस्थानी सशस्त्र बल, नौदलाच्या समुद्री मारक क्षमतेला वाढवण्याचे काम करणार आहे. आधुनिक युद्धात समुद्र सुरक्षेचे महत्त्व वाढत आहेत. यामुळे ही मिसाइल शत्रूंच्या युद्धनौका आणि समुद्री लक्ष्यांना अचूकपणे नष्ट करण्यास मदत करेल.
हिंदुस्थान एलीट क्लबमध्ये सामील
या यशस्वी चाचणीनंतर हिंदुस्थान आता जगातील काही निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे. ज्या देशांकडे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (आयसीबीएम)चे धोके ओळखून त्यांना नष्ट करण्याची टेक्नोलॉजी आहे. आयसीबीएम अशी मिसाईल असते जी एका महाद्विपापासून दुसऱ्या महाद्विपापर्यंत जवळपास 5 हजार किमी दूर मिसाइल नष्ट करू शकते. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या देशांकडेच ही ताकद होती.
























































