
मुंबईत 100 टक्क्यांवर नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत असताना अनेक नाले अजूनही गाळ आणि कचऱ्याने भरलेले आहेत. यातच कंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा आणि विलंब केल्याचा प्रकार ‘एआय’च्या तपासणीत समोर आला आहे. त्यामुळे या कंत्राटदारांना पालिकेने तब्बल 9 कोटी 25 लाख 72 हजार 830 रुपयांचा दंड केला आहे. कंत्राटदारांच्या बिलातून ही दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
सफाईच्या कामासाठी छायाचित्रणासोबत 30 सेकंदांचे चित्रीकरण (व्हिडीओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. शिवाय गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडीओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली) च्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे.
या निकषांमध्येही कंत्राटदार नापास
नालेसफाईच्या कामांमध्ये आवश्यक संयंत्रे, यंत्रसामग्री व वाहनांची अपुरी उपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता, नाले स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा न करणे, उपसलेल्या गाळावर विहित पद्धतीने प्रक्रिया न करणे तसेच कामे संथ गतीने करून निर्धारित वेळापत्रकाचे पालन न करणे अशा विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याचा ठपकाही कंत्राटदारांवर ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
अशी पकडली चोरी
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची अंमलबजावणी करताना जी छायाचित्रे आणि चित्रफिती अपलोड केले जातात त्या सगळ्यांची एआय प्रणाली पाहणी करते. तसेच त्यातील त्रुटी शोधून काढते. या त्रुटी शोधून काढण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. वजन काट्यावर जेव्हा वाहन वजनासाठी येते, त्यावेळी ताडपत्री हटवली जात आहे किंवा नाही हे एआयच्या माध्यमातून शोधण्यात आले.
याशिवाय एकाच प्रतिमेचा पुनर्वापर अथवा प्रतिमांमधील विसंगती, वाहनातील गाळाची विल्हेवाट लावताना त्यामधून उडणाऱ्या धुळीच्या प्रमाणाचे निरीक्षण, आवश्यक छायाचित्रे उपलब्ध नसणे, प्रत्यक्ष तपासणी, गाळ उतरविण्याच्या कामांच्या चित्रफिती अपलोड न करणे आणि नोंदणीकृत वाहने किंवा वर्ककोड आणि प्रत्यक्ष कामातील तपशीलामध्ये विसंगती आढळली.


























































