‘अन्न व औषध’चे साताऱ्यात छापे; गुटखा, तंबाखूचा साठा जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सातारा शहरात केलेल्या कारवाईत सुमारे 10.2 किलो वजनाचा व 19 हजार 78 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीसह संबंधित उत्पादक कंपन्यांच्या मालक, भागीदार व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी ऋतुजा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे, तर शुभम राजू कांबळे (वय 27, रा. एकदंत अपार्टमेंट, करंजे, सातारा) याच्यासह संबंधित उत्पादक कंपन्यांच्या मालक, भागीदार व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाने 20 जुलै 2025 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर प्रतिबंध घातला आहे. असे असतानाही संबंधितांकडे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. कारवाईदरम्यान विमल पानमसाला नेव्ही ब्ल्यू, विमल पानमसाला ब्ल्यू, विमल पानमसाला किंग, व्ही-1 टोबॅको किंग, व्ही-1 टोबॅको, रॉयल 717 टोबॅको तसेच हिरा पानमसाला या विविध बँडचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे एकूण वजन सुमारे 10.2 किलो असून, त्याचे बाजारमूल्य 19 हजार 78 रुपये असल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, सातारा शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.